
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय येथील अंध विद्यार्थ्यांना पुढील काळात आपले जीवन जगणे सोपे जाणार आहे. त्यांना नुकताच एआय तंत्रज्ञानावर आधारित चष्म्यांचे वितरण करण्यात आले. या चष्म्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची वर्णनात्मक माहिती, दिशादर्शक फलक,तसेच अभ्यास, वाचन इत्यादी करणे सोपे जाणार आहेत. त्यामुळे हा चष्मा अंध विद्यार्थ्यांसाठी तिसरा डोळ्याचे काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.
देवगिरी महाविद्यालय येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, पूर्व मद्रास रोटरी क्लब, एसएससी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि हेल्प द ब्लाइंड फाऊंडेशन व देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट दृष्टी अंतर्गत कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी कार्यक्रमांतर्गत इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने २४ लाख किमतीचे अंध विद्यार्थ्यांसाठी १५० स्मार्ट व्हिजन चष्मा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. सुदेश डोंगरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी अंध विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आतापर्यंत विविध सॉफ्टवेअर, ब्रेल टाईपराईटर, ध्वनिफिती अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात येते तसेच दृष्टिहीन विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येते, याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मशिप्र मंडळ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विवेक जयस्वाल उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संजीव रंजन, मोहम्मद इब्राहिम, निवास राव, धीरज कुमार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रोफेसर अशोक तेजनकर उपस्थित होते.
अंध विद्यार्थ्यांसाठी तिसरा डोळा
सदर चष्मा हे उपकरण अंध विद्यार्थ्यांसाठी तिसरा डोळा असल्याचे प्रतिपादन इंडियन ऑइल कार्पोरेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक संजीव रंजन यांनी केले. हा चष्मा एआय तंत्रज्ञानावर आधारित असून या चष्म्यामुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना समोरील गोष्टींची इत्यंभूत माहिती मिळते. या चष्म्यामुळे त्यांना समोर असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची वर्णनात्मक माहिती, दिशादर्शक फलक, तसेच अभ्यास, वाचन इत्यादी करता येणार आहे. या चष्म्यामध्ये १५ वेगवेगळे फीचर्स आहेत, वॉकिंग मोड, इमर्जन्सी मोड आदीमुळे दृष्टिहीन विद्यार्थी स्वतः स्वतःची मदत करू शकतात, अशी माहिती एसएचजी टेक्नॉलॉजी उपाध्यक्ष मोहम्मद इब्राहिम यांनी दिली.