
मुरूड-जंजिरा : मुरूड-जंजिरा समुद्रकिनारी ‘ब्लू बटन जेलीफिश’ या निळसर रंगाच्या आकर्षक परंतु संवेदनशील समुद्री जीवामुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असली, तरी या ‘ब्लू बटन जेलीफिश’जीवाशी संपर्क साधणे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकते. अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरूडमधील प्राणीशास्त्र विभागामार्फत या ‘ब्लू बटन जेलीफिश’विषयी जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे.
पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता अनुभवण्याची संधी मिळते. मात्र त्याचबरोबर नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो.
पर्यटकांनी नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना सावधगिरी आणि जागरूकता बाळगणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरूडमधील प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. जावेद खान, प्रा. अल्ताफ फकीर व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी केले आहे.
ब्लू बटन जेलीफिशची माहिती
- वैज्ञानिक नाव: पोरपीटा पोरपीटा
- प्रकार: खरा जेलीफिश नसून, हायड्रॉझोअन पॉलिप्सच्या वसाहतींचा समूह
- आकार व रंग: साधारण २–३ सें.मी. व्यासाचा, निळसर रंगाचा, पारदर्शक पिशवीसारखा दिसतो
- वास्तव्य: उष्णकटिबंधीय आणि उप उष्णकटिबंधीय समुद्रातील पृष्ठभागावर तरंगतो
- धोका: आकर्षक दिसतो, पण स्पर्श झाल्यास त्वचेवर खाज, सूज, जळजळ आणि चट्टे निर्माण होतात.