

मुंबई : उमेदवार जाहीर केल्यास बंडखोरी, उमेदवार पळवापळवी होण्याच्या भीतीपोटी भाजप - शिवसेना, मनसे व ठाकरे सेनेने आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवले आहेत. मात्र, जे उमेदवार निवडून येतील किंवा त्या उमेदवाराचे आपल्या प्रभागात पारडे जड आहे, अशा इच्छुकांना पक्षांनी आधीच उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित झालेल्या भाजप, शिंदे सेना, मनसे, ठाकरे सेनेसह दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपल्या प्रभागात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास फक्त दोन दिवस शिल्लक असून मंगळवार हा अखेरचा दिवस आहे. मात्र, अद्याप भाजप - शिवसेना, मनसे व ठाकरे सेना तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उमेदवार कधी जाहीर होणार याची उत्सुकता सर्वंच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना लागली आहे. मात्र, उमेदवार जाहीर होताच पक्षांतर्गत नाराजीचा सूर आळवला जाईल, बंडखोरी, उमेदवार पळवापळवी होईल या भीतीपोटी सर्वंच राजकीय पक्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विशेष खबरदारी घेतली आहे.
दरम्यान, भाजप, शिंदे सेना, ठाकरे सेना, मनसे, अजित पवारांची राष्ट्रवादी व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने निवडून येणाऱ्यांची उमेदवारी आधीच निश्चित केली आहे. त्यामुळे सोमवार व मंगळवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची पूर्ण तयारी उमेदवारी निश्चित झालेल्यांनी केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.
हे उमेदवार निश्चित
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक १४१ मधून विठ्ठल लोकरे, ठाकरे सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर दहिसर प्रभाग क्रमांक २ मधून, प्रभाग क्रमांक ६२ मधून चंगेच मुल्तानी यांचे पुत्र झिशान मुल्तानी हे ठाकरे सेनेकडून, ठाकरे सेनेच्या नेत्या व माजी महापौर विशाखा राऊत या प्रभाग क्रमांक १९१ मधून, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विलास घुले प्रभाग प्रभाग क्रमांक ४० मधून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमेय घोळे यांची वडाळा येथून, तर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका राखी जाधव यांची घाटकोपरमधून उमेदवारी निश्चित झाली असून या उमेदवारांनी प्रभागात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.