बंडखोरी अन् धावपळ; भाजप कार्यालय, ‘मातोश्री’वर संतप्त कार्यकर्त्यांची धडक; १४ महापालिकांमध्ये महायुतीत दरी; मुंबई, ठाण्यात भाजप-शिंदे सेनेची युती
मुंबई : गेल्या काही वर्षांत सर्वंच राजकीय पक्षांमध्ये ‘आयाराम-गयाराम’ची संख्या वाढली आहे. या पक्षातून त्या पक्षात उडी मारून आलेल्यांना त्या-त्या पक्षात सन्मानपूर्वक वागणूक मिळते. मात्र, पक्षाशी एकनिष्ठ राहूनही ऐन निवडणुकीत डावलले जात असल्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. आपल्याच उमेदवाराविरोधात बंडखोर मैदानात उतरल्याने बंडोबांचे बंड थोपविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे.
‘मातोश्री’ निवासस्थान, भाजप कार्यालय व एकनाथ शिंदे यांच्याकडे निष्ठावतांनी नाराजी व्यक्त करत पक्ष कार्यालयातील पोस्टर फाडल्याचे प्रकार घडले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती एकत्र रिंगणात उतरले होते. मात्र, राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी १४ महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत दरार पडली आहे. दरम्यान, १४ महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-सेना एकत्र लढत नसले तरी नवी मुंबई, ठाण्यात भाजप व शिवसेना एकत्र लढत आहेत.
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एकाकी पडल्याने त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, तर राज्यातील १४ महानगरपालिकेत भाजप-शिवसेनेत गणित जुळले नाही आणि युती ताणली गेली. छत्रपती संभाजीनगर येथे भाजपमुळे युती तुटली, असा थेट आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तथा मंत्री संजय शिरसाट यांनी केला. मंगळवार, ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असताना सर्वच पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू होत्या.
काही इच्छुकांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते, तर अनेक पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. काही ठिकाणी पक्षांतर करणाऱ्या ‘आयारामांना तिकीट दिल्याने पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे. काही महानगरपालिकांमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्याने पक्षाने आक्रमक भूमिका घेतली, तर काही ठिकाणी शिंदे गटाने युती करण्यास स्पष्ट नकार दिला. स्थानिक राजकीय गणिते आणि परिस्थिती लक्षात घेता दोन्ही पक्षांनी काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एकूणच २९ पैकी १४ महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना स्वतंत्र लढणार आहेत.
या ठिकाणी स्वतंत्र लढत
पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या महापालिकांमध्ये भाजप व शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत.
अनिल कोकीळ शिंदे गटात दाखल
वॉर्ड क्रमांक २०४ मधून उद्धव ठाकरे यांनी किरण तावडेंना उमेदवारी जाहीर करताच अनिल कोकीळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अर्ध्या तासात प्रभाग क्रमांक २०४ मधून अनिल कोकीळ यांना लगेच ‘एबी फॉर्म’ मिळाला. खासदार मिलिंद देवरा यांनी त्यांना ‘एबी फॉर्म’ दिला. अनिल कोकीळ वॉर्ड क्रमांक २०४ मधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत.

