
मुंबई : मुंबईसह राज्यात शैक्षणिक अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीविरोधात रान पेटलेले असताना मराठी शाळांची अवस्था मात्र दयनीय आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण घेणारे केवळ ३३ हजार ७२९ विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. याउलट हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या ६७ हजार ४१७ इतकी असून ती मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांपेक्षा दुप्पट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महापालिका शाळांमध्ये अनेक भाषांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमांचा विशेष दबदबा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत मराठी माध्यमाला गळती लागल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेत मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या २६२ आहे, परंतु या शाळांमध्ये केवळ ३३ हजार ७२९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर हिंदी माध्यमाच्या शाळांची संख्या एकूण २२० आहे, जी मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा ४२ ने कमी आहे. असे असूनही, हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या ६७ हजार ४१७ इतकी आहे. याचा अर्थ हिंदी माध्यमाच्या शाळा मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा संख्येने कमी असूनही, त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने दुप्पट आहे, तर विविध इंग्रजी माध्यमाच्या १४९ शाळा असून त्यात विद्यार्थी संख्या ८८ हजार २९५ एवढी असल्याची माहिती समोर आहे.
दरम्यान, या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, मुंबई महापालिकांच्या शाळेत हिंदी माध्यमाला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे मुंबईत स्थानिक भाषेशिवाय इतर भाषिक माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसतो आहे. परराज्यातून आलेल्या हिंदी भाषिकांची संख्या देखील यातून अधोरेखित होते.
उर्दू शाळांची स्थिती मराठीपेक्षा चांगली
मुंबईतील उर्दू माध्यमाच्या शाळांची स्थितीही मराठी शाळांपेक्षा अधिक चांगली असल्याचे दिसून येते. मुंबईत १८८ उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत आणि या शाळांमध्ये ६४ हजार ३९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या मराठी आणि हिंदी दोन्ही माध्यमांपेक्षा कमी असली. तरी विद्यार्थ्यांची संख्या मराठी माध्यमापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.