

मुंबई : राज्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला आहे. तरीही शेतकऱ्यांना अजून खताचा योग्य पुरवठा नाही. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून राज्यात बोगस बियाण्यांचा सर्वात जास्त पुरवठा गुजरातमधून होत असून गुजरातकडून महाराष्ट्राची लूट चालली असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडून यांनी विधान परिषदेत लक्षवेधीवर बोलताना केला.
सदस्य सदाभाऊ खोत यांनी यंदाच्या खरीप हंगामात राज्यासमोर कमी पावसाचे संकट निर्माण होण्याची शक्यता असून जागतिक परिस्थितीमुळे रासायनिक खतांच्या उपलब्धतेवरही परिणाम होण्याची शक्यता यावर सभागृहाचे लक्ष वेधले होते.
लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, एल निनोच्या प्रभाव सौम्य करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी जनसंधारणाची कामे युद्धपातळीवर करणे, पीक नियोजनासाठी खतांचा योग्य वापर, अल निनोमुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांच्या आपत्कालीन पीक नियोजनाच्या शिफारशी, तसेच ८० ते १०० मिमी पावसानंतरच पेरणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आल्या होत्या.
खतांबाबत माहिती देताना मंत्री म्हणाले की, राज्याला ४८.८० लाख मे. टन खतांची मंजुरी मिळाली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला २५.५३ लाख मे. टन खताचा साठा शिल्लक होता, तर जूनअखेर राज्याला एकूण १७.९९ लाख मे. टन खताचा पुरवठा झाला. तसेच ऐन मागणीच्या वेळी पुरवठा व्हावा म्हणून युरिया खताचा १,४१,७९५ मे. टन व डीएपी खताचा १९,०४३ मे. टन संरक्षित खतसाठा करण्यात आल्याचे जयस्वाल म्हणाले.
मंत्र्यांच्या उत्तरावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यात २७ कंपन्यांच्या ३५० जैविक उत्पादनांवर बंदी आहे. मात्र ती खुलेआम बाजारात विकली जात आहेत.