

मुंबई/नागपूर/पुणे : महाराष्ट्रातील नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबई व पुणे महानगरपालिकांच्या महापौर कार्यालयांना बुधवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर काही ठिकाणी तातडीने परिसर रिकामा करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांना आलेल्या एका ईमेलमध्ये महाल भागातील आरएसएस मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे स्फोटके ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. या धमकीमुळे पोलिसांची चांगलीच पळापळ झाली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेलाही राज्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा इशारा देणारे ईमेल आले आहेत. यामध्ये महापौर कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा समावेश आहे. महापालिकेच्या अनेक अधिकृत ईमेल आयडीवर हे ईमेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ तपास सुरू केला आहे.
कथित खलिस्तानवाद्यांचा इमेल
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ईमेलमध्ये महापौर कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई शेअर बाजार इमारत आणि महापालिका कार्यालयांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये 'खलिस्तान'चा उल्लेख असून विविध संस्थांना लक्ष्य करणारा प्रक्षोभक मजकूर आहे. दुपारी १:११ वाजता मुंबई महापौर कार्यालयाजवळ आयईडी स्फोटकांनी भरलेली कार वापरून स्फोट घडवला जाईल, असा दावा या ईमेलमध्ये करण्यात आला होता. तसेच बीएसई इमारत, मुख्यमंत्री कार्यालय आणि बीएमसी कार्यालयांमध्येही ठरावीक वेळेत स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती.
पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय आणि महापौर कार्यालयालाही असाच बॉम्बचा धमकीचा ईमेल आला. खबरदारी म्हणून महापालिकेची संपूर्ण मुख्य प्रशासकीय इमारत रिकामी करण्यात आली आणि बॉम्ब शोधक पथकाने तिथे कसून तपास केला. स्वतःला 'खलिस्तान नॅशनल आर्मी' म्हणवणाऱ्या एका संघटनेने हा ईमेल पाठवल्याचा संशय आहे. त्यांनी पुणे महापालिका महापौर कार्यालयात दुपारी १:११ वाजता, विधान भवनात दुपारी ३:११ वाजता आणि नागपूरमधील आरएसएस मुख्यालयात दुपारी ३:११ वाजता आयईडी स्फोट मालिका घडवून आणण्याची धमकी दिली होती.
ई-मेलचा शोध सुरू
१९८४ मधील 'ऑपरेशन ब्लूस्टार' आणि 'ऑपरेशन वूडरोझ'ला आरएसएसने पाठिंबा दिला होता, असा दावा या ईमेलमध्ये करण्यात आला असून, याचा 'बदला' घेण्याची आणि भाजप-आरएसएस 'संपवण्याची' भाषा करण्यात आली आहे, असे पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे महापालिका आवारात पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि पुणे येथील महापालिका मुख्यालये आणि महापौर कार्यालयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हे ईमेल नेमके कुठून आले, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे तपास पथक काम करत आहे.