गिरीश महाजन यांना दिलासा; 'ते' व्हिडिओ हटवण्याचे हायकोर्टाचे युट्यूबर्सना आदेश

महायुतीतील जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध दोन युट्यूबरने अपलोड केलेले सहा व्हिडिओ हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महायुतीतील जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध दोन युट्यूबरने अपलोड केलेले सहा व्हिडिओ हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. संबंधित व्हिडिओ `प्रथमदर्शनी बदनामीकारक` असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी २० जून रोजी निश्चित करण्यात आली आहे.

याचिकेत केलेल्या दाव्यानुसार गिरीश महाजन हे अंतरिम दिलासा मिळण्यासाठी पात्र असल्याचं न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं. व्हिडिओंमध्ये प्रतिवादींनी गिरीश महाजन यांच्याबाबत केलेले वक्तव्य प्रथमदर्शनी बदनामीकारक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

प्रतिवादींना त्यांनी अपलोड केलेले सहा व्हिडिओ त्वरित काढून टाकण्याचे/डिलीट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. महाजन यांच्याविरुद्ध बदनामीकारक असे कोणतेही व्हिडिओ किंवा पोस्ट अपलोड करण्यापासूनही त्यांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. महाजन यांनी अनिल थत्ते आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. यामध्ये त्यांच्याविरुद्ध निराधार आरोप केले आहेत, असा दावा त्यांनी केला होता.

logo
marathi.freepressjournal.in