शहरी नक्षलवाद प्रकरण : गौतम नवलखा यांना जामीन मंजूर; NIA ला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत

या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरीता ६ आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी एनआयएने न्यायालयात केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने अंशत:ही मागणी मान्य करत ३ आठवड्यांची स्थगिती दिली आहे.
शहरी नक्षलवाद प्रकरण : गौतम नवलखा यांना जामीन मंजूर; NIA ला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत

शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरीता ६ आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी एनआयएने न्यायालयात केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने अंशत:ही मागणी मान्य करत ३ आठवड्यांची स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने नवलखा यांना जामीन मंजूर केला आहे.

गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांत प्रथमदर्शी तथ्य असल्याचे पुरावे आहेत, असे निरिक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विशेष एनआयए कोर्टाने जामीन फेटाळल्याच्या निर्णयावर पुन्हा सुनावणी घेतली होती.

नवलखा यांच्याकडून अनेक कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. आरोपपत्रात असलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होतंय की, नवलखा हे या गुन्ह्यात आणि कटकारस्थानातही सहभागी होते. याशिवाय अन्य आरोपींप्रमाणे ते शस्त्रास्त्र प्रशिक्षणातही सामील होते, असे निरिक्षण यावेळी कोर्टाने नोंदवले होते. तसेच काश्मीर मुक्त संघटनेचा सय्यद गुलाम नबी फई याच्या सोबत नवलखा यांचे संबंध असल्याचा आरोपही एनआयएने केला आहे.

नवलखा यांना नजरकैदेत असताना इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप, आयपॅड किंवा इतर कोणतेही संपर्काचे साधन वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली होती. त्यांना दिवसातून एकदाच दहा मिनिटांसाठी सुरक्षा रक्षकांनी दिलेला फोन वापरण्यास परनवानगी होती.

logo
marathi.freepressjournal.in