

मुंबई : दिवाळीत शहरातील वाढते वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी फटाके फोडण्याच्या वेळा निश्चित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचा विचार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
अभिनेत्री दिया मिर्झाचा प्रदुषणाबाबतचा जनजागृतीपर व्हिडीओ मुंबई महापालिकेने हटवल्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली होती. या प्रकरणी न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने आदेश दिला आहे. आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली. सर्वोच्च न्यायालयाने एनसीआरमध्ये दिवाळीत केवळ मान्यताप्राप्त हरित फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या दोन वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील स्थानिक परिस्थितीचा विचार करून राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांनी या निर्देशांची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेणे योग्य ठरेल, असे उच्च न्यायालयाने नमूद केले.
दिल्ली-एनसीआर परिसरात वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबरला काही निर्देश दिले होते. त्यांचा संदर्भ देत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई महापालिका आणि पोलीस दलासह संबंधित यंत्रणांनी या निर्देशांचा विचार करावा, अशी सूचना केली आहे.