कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

कोकणातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे जतन करा, या कातळशिल्पांचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला चार कोटी ३२ लाखांचा निधी वापरा असे आदेशच मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले.
कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Published on

मुंबई : कोकणातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे जतन करा, या कातळशिल्पांचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला चार कोटी ३२ लाखांचा निधी वापरा असे आदेशच मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी सुचीत केलेल्या १७ स्थळांव्यक्तीरिक्त अन्य स्थळे सुचविण्याची याचिकाकर्त्यांना मुभा देत याचिका निकाली काढली.

रत्नागिरीतील बारसू (राजापूर) परिसरातील शेतकरी गणपत राऊत, रामचंद्र शेळके आणि महेंद्रकुमार गुरव यांच्यावतीने अ‍ॅड. हमजा लकडावाला यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ वकील गायत्री सिंग यांनी कोकणातील कातळशिल्पांचे ऐतिहासिक महत्त्व निदर्शनास आणून दिले. बारसू, सोलगाव आणि देवाचे गोठणे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कातळशिल्पे आहेत. किमान १० हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेली ही कातळशिल्पे केंद्र आणि राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे कायमस्वरूपी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे, येथील कातळशिल्पांची युनेस्कोनेही दखल घेतली आहे, याकडे अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. दरम्यान कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे हजारो वर्षांपासून कातळशिल्प अस्तित्वात आहेत. या कातळशिल्पांचे जतन करण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने दिले. तसेच या कातळशिल्पांचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मंजूर केलेला निधी वापरण्याचे आदेश दिले.

अन्य स्थळे सुचवा

यावेळी राज्य सरकारने या परीसरातील १७ कातळशिल्पे देखभाल करण्यासाठी निश्चित केली असून सुमारे चार कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती न्यायालयाला दिली. याची दखल घेत खंडपीठाने हा निधी कातळशिल्पांचे जतन, संवर्धन, विकास आणि व्यवस्थापनासाठी वापरण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. तसेच या कातळशिल्पांव्यतीरिक्त अन्य स्थळे सुचविण्याची मुभा याचिकाकर्त्यांना देत याचिका निकाली काढली.

logo
marathi.freepressjournal.in