

मुंबई : पुण्यातील बुधवार पेठ भागातील श्रीराज लॉज चालवणाऱ्या भाडेकरूला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. लॉजमधील ग्राहकांमुळे होणाऱ्या उपद्रवाचा आणि त्रासाचा विचार करून न्यायालयाने संबंधित लॉज तीन महिन्यांत रिकामे करून त्याचा ताबा मालकाकडे देण्याचे आदेश दिले. एखादा भाडेकरू शेजारी राहणाऱ्या मालकाच्या खासगी जीवनात व मानसिक शांततेत बाधा आणणारा व्यवसाय करत असेल तर तो ‘उपद्रव’ मानला जाईल, असे निरीक्षण नोंदवले.
बुधवार पेठ येथील घर क्रमांक १९२२ मधील जागा शब्बीर फिदाहुसेन काचवाला यांच्या मालकीची आहे. या इमारतीत ५० वर्षांहून अधिक काळ श्रीराज लॉज भाड्याने चालवले जात आहे. घरमालक हे त्याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहतात. लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांची गर्दी, भांडणे, अनैतिक कृत्ये यामुळे कुटुंबाला त्रास होत असल्याचा दावा घरमालकाने केला होता.