

अमेय रेठरेकर
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी, विरोधक, अपक्ष आणि बंडखोर अशा सर्वांनीच प्रचाराचे रान उठवले होते. मात्र, यंदाची निवडणूक केवळ सभा आणि पदयात्रांपुरती मर्यादित न राहता, ती व्हॉट्सॲप स्टेटस आणि इंस्टाग्राम रील्सवर खऱ्या अर्थाने गाजली. प्रचाराच्या या रणधुमाळीत गाजले ते म्हणजे उमेदवारांचे 'फिल्मी' डायलॉग आणि कार्यकर्त्यांनी उडवलेला सोशल मीडियाचा 'धुरळा'.
डिजिटल मैदानात 'किंग मेकर' ठरले डायलॉग
निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार मतांसाठी लोकांच्या दारापर्यंत पोहोचत असतानाच, त्यांचे समर्थक मात्र सोशल मीडियावर शब्दांच्या फैरी झाडत होते. "जनतेच्या विश्वासाचा धुरंदर" आणि "बॉस पॅटर्न" सारख्या टॅगलाईन्सने तरुणाईला आकर्षित केले. विशेषतः बंडखोर उमेदवारांच्या स्टेटसवर "एखादी हार असावी युद्धात पण तडजोड नसावी तत्त्वात" या ओळींचा प्रचंड बोलबाला पाहायला मिळाला.
बंडखोर आणि विरोधकांचा 'रगेल' अवतार
ज्या उमेदवारांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती, त्यांनी "ज्यांना वाटत होतं हुनर नाही, करणार नाही, केलय बघ!" असं म्हणत थेट आव्हान दिले. तर काहींनी "कुणाच्या बी नादी लाग, पण या रगेलच्या नादी नको लागूस" अशा सज्जड इशाऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल केले. विरोधकांना नमवण्यासाठी "बाप बाप होता है..." आणि "मोठे मोठे गार केले गम्मत मध्ये" यांसारख्या संवादांनी कमेंट सेक्शन अक्षरशः ओसंडून वाहत होते.
चाणक्य नीती विरुद्ध वाघाची डरकाळी
राजकीय समीकरणांची चर्चा करताना "वाघाची डरकाळी विरुद्ध चाणक्य नीती" असा सामना रंगल्याचे चित्र होते. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांनी "आता तुमची बारी, आमची युती लय भारी" म्हणत विरोधकांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. विशेषतः कोल्हापूर पट्ट्यात "कोल्हापूर कस्स? तुम्ही म्हणशीला तसं!" या वाक्याने स्थानिक अस्मितेचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला.
आव्हानात्मक शायरीची मेजवानी
ज्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे किंवा इतर आरोप झाले, त्यांच्या समर्थकांनी भावनिक साद घालत "हाथी, घोड़े, तोप, तलवारें, फ़ौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है" अशी शायरी वापरून आपल्या नेत्याची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला.
एकूणच, प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात कुणाला गुलाल लागला आणि कुणाला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी सोशल मीडियाच्या पडद्यावर मात्र या 'डायलॉगबाजी'ने मोठा प्रभाव पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.