
त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी अर्थात उद्या ( दि. ११ ) ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी मोठ्या संख्येने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. प्रशासकिय सूत्रांच्या अनुमानानुसार उद्या किमान दोन लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वाहतूक कोंडी होवू नये यासाठी पार्किंग नियोजन करण्यात आले आहे.
हजारो भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेत भाविक खासगी वाहने सोबत घेवून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता गडद होते. त्यानुषंगाने तळेगाव अंजनेरी आणि खंबाळे येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईहून येणाऱ्यांसाठी पहिने तर गुजरातहून येणाऱ्यांसाठी अंबोली गावात पार्किंग व्यवस्था असेल. घोषित पार्किंग ठिकाणाहून परिवहन मंडळाच्या बसेसद्वारे भाविकांना कुंभमेळा बसस्थानकापर्यंत येता येईल. त्यानंतर भाविक स्नानासाठी कुशावर्त आणि लगोलग प्रदक्षिणेसाठी रवाना होवू शकतील.
पोलीस प्रशासन सूत्रांच्या माहितीनुसार, चोख कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रदक्षिणा मार्गावर पोलीस आणि होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.अपेक्षित गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने दोन दिवस व्हीआयपी दर्शन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.