जगबुडी नदीवरील पुलाला तडे, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद; पर्यायी मार्ग सुरू

मुंबई गोवा महामार्गावरील विघ्न पावसाळ्यात टळता टळत नाही. रविवारी महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदीवरील मोठ्या पुलाला भगदाड पडल्याचे दिसून आले.
जगबुडी नदीवरील पुलाला तडे, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद; पर्यायी मार्ग सुरू
Published on

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील विघ्न पावसाळ्यात टळता टळत नाही. रविवारी महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदीवरील मोठ्या पुलाला भगदाड पडल्याचे दिसून आले. कोकणात मुंबई-गोवा महामार्गावर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अशी ओरड वारंवार होत आहे; मात्र त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून, कोकणवासीय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

चार वर्षांपूर्वी याच हायवे वरती खेडचे तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आवाज उठवला होता; आंदोलनही केले होते. बांधकाम करणाऱ्या अभियंत्याला कडक शब्दांत सुनावले होते व कामाविषयी तक्रार केली होती; मात्र या आंदोलनामुळे त्यांना जवळपास दीड महिना तुरुंगात जावे लागले होते. हे भगदाड पाहिल्यानंतर तत्कालीन नगराध्यक्षांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, “मी काम कमी दर्जाचे आहे हे वारंवार सांगत होतो. त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नव्हते. परशुराम घाट लँड स्लाईड, बहादूर शेख नाक्यावरचा ब्रिज कोसळला, डी. बी. जे. कॉलेजची भिंत कोसळली आणि आज या ब्रिजला भागदाड पडले.”

महामार्ग खड्डेमय

मुंबई-गोवा महामार्ग खेड, संगमेश्वर ते अगदी लांजापर्यंत खड्डेमय झाला असून, वाहतुकीला धोकादायक बनला आहे. महामार्गावर प्रचंड प्रमाणात चिखल निर्माण झालेला असून, खडी व त्यातील खड्डे यामुळे दुचाकी, चारचाकी घसरण्याचे प्रकार घडत आहेत.

पावसाचे प्रमाण प्रचंड - अभियंत्यांचे म्हणणे

यावर्षी पावसाचे प्रमाण प्रचंड आहे. पाऊस संततधार कोसळत असल्यामुळे रस्त्याची कामे डागडुजी करणे शक्य होत नसल्याचे येथील अभियंत्यानी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in