मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये पहिला अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. सदर अर्थसंकल्प हा देशाला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून युवा, महिला, शेतकरी आणि गरीब सक्षम होतील. या अर्थसंकल्पात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने जाहीर केलेल्या योजना तरुणांच्या आकांक्षांना ताकद देतील, असे मत महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
“मोदी सरकारने रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी विशेष तरतूद केली आहे. पंतप्रधान पॅकेजअंतर्गत ‘रोजगार संबंधित प्रोत्साहन’ या योजनेत तीन प्रमुख योजना जाहीर केल्या आहेत. रोजगार, कौशल्य, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करत सरकारने पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या काळात ४ कोटींहून अधिक तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा अर्थसंकल्प भारतातील सर्व वर्गांना विशेषत: तरुण पिढीला विकसित बनवणारा अर्थसंकल्प आहे. या महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे लोढा मनःपूर्वक आभार,” असे लोढा म्हणाले.