

दुबार आणि बोगस मतदारांवरून राज्यातील विरोधक आधीच आक्रमक झालेले असताना आज (दि.२) मतदानादरम्यान बुलढाण्यात यावरून मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. बुलढाणा नगरपालिकेच्या मतदानावेळी एका बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले आणि चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत होते. मात्र, त्याचवेळी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने बोगस आमदाराला पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे.
राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, बुलढाणा नगरपालिकेच्या मतदानावेळी अवघ्या दीड-दोन तासांतच बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला. मतदार प्रतिनिधींनी त्याला रंगेहाथ पकडले असता स्थानिकांनी त्याला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत होते. पण तो पळून गेला.
यावेळी आमदार गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड याने बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि काँग्रेसने केला असून आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर या घटनेचा व्हिडिओही शेअर केला आहे.
पोलिसांना शिवीगाळ आणि दमदाटी - काँग्रेसचा आरोप
"बुलढाण्यात शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड ग्रामीण भागातून लोकांना आणून नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदान करून घेत आहेत. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बोगस मतदारांना पकडून पोलिसांच्या हवाली करत असताना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड याने पोलिसाला शिवीगाळ आणि दमदाटी करून बोगस मतदाराला पळवून लावले", असा आरोप काँग्रेसने केला असून या प्रकरणी कुणाल गायकवाड याच्याविरोधात बोगस मतदान आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणीही केली आहे.
मालकांविरोधात काहीच करायचं नाही हे आयोगाने ठरवलंय का? - रोहित पवार
तर, आम्ही सातत्याने आयोगाला दुबार मतदारांबाबत कठोर उपाययोजना करण्याची विनंती करत होतो पण आयोगाकडून याची कसलीही दखल घेतली गेली नाही. आता तर सत्ताधारी आमदारच दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालण्याचे काम करत आहेत. बुलढाण्यात बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले असते मात्र बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने व पुतण्याने पोलिसांशी हुज्जत घालून बोगस मतदाराला पळवून लावले. यावरून सत्ताधारी लोक मतदान प्रक्रियेत दिवसाढवळ्या किती घोळ घालत आहेत हेच दिसून येतं. सत्ताधारी लोक सातत्याने बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणुक प्रक्रिया प्रभावित करत असून आयोग मात्र झोपा काढत आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली. तसेच, मालकांविरोधात काहीच करायचं नाही हे आयोगाने ठरवलंय का? असा सवालही त्यांनी विचारला.
बघा व्हिडिओ -
दरम्यान, बुलढाणा नगरपालिका निवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदानासाठी घाटाखालून २ गाड्या भरून बोगस मतदार आणल्याचा आरोपही आमदार गायकवाड यांच्यावर काँग्रेसने केला आहे. आतापर्यंत तीन बोगस मतदारांना येथे पकडण्यात आल्याचे समजते.