भाडेवाढीचा बोजा; १ फेब्रुवारीपासून ‘एमएमआर’ क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात वाढ, आजपासून एसटीची १४.९५ टक्के भाडेवाढ

महायुती सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सर्वसामान्यांवर भाडेवाढीचा बोजा टाकला आहे.
भाडेवाढीचा बोजा; १ फेब्रुवारीपासून ‘एमएमआर’ क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात वाढ, आजपासून एसटीची १४.९५ टक्के भाडेवाढ
Published on

मुंबई : महायुती सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सर्वसामान्यांवर भाडेवाढीचा बोजा टाकला आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. २४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. यासोबतच प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) काळी पिवळी मीटर-टॅक्सी आणि ऑटोरिक्षा यांच्याही भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. १ फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ लागू होणार असून काळी पिवळी मीटर-टॅक्सीचे भाडेदर २८ रुपयांवरून ३१ रुपये होणार आहे, तर रिक्षाचे भाडे २३ वरून २६ रुपये होणार असल्याने एमएमआर क्षेत्रातील नागरिकांना आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे.

भाडेवाढ करण्याबाबतचे प्रस्ताव एसटी महामंडळ आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांनी राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक गुरुवारी उशिरा पार पडली. या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. गृह विभागाचे (परिवहन) अपर मुख्य सचिव तथा अध्यक्ष राज्य परिवहन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) व परिवहन आयुक्त उपस्थित होते.

वाहनांसाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सूत्रानुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी १ जानेवारीला महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ही भाडेवाढ करण्यात आली. यापूर्वी २६ सप्टेंबर २०११ रोजी भाडेवाढ करण्यात आली होती. हकीम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार महामंडळाला वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. ही भाडेवाढ २५ जानेवारीपासून (२४ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर) अंमलात येईल, असे निर्देश प्राधिकरणाने दिले. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक नवीन बीएस ६ मानकाच्या नवीन साध्या बसेस टोमॅटो लाल रंगसंगतीस प्राधिकरणाने मान्यता दिली. त्याचप्रमाणे महामंडळाने ५० ई- बसेससाठी पांढरा व हिरवा रंग तसेच १०० बसेससाठी सद्य:स्थितीत वापरात असलेल्या शिवनेरीप्रमाणे आकाशी याप्रमाणे रंगसंगतीस मंजुरी दिली.

एसटीसाठी एवढे अधिकचे पैसे मोजावे लागणार

- दादर - स्वारगेट - साधी बस - ३७ रुपये, निमआराम - ५० रुपये, शिवशाही - ५३ रुपये, शिवनेरी - ७७ रुपये, शिवाई - ५४ रुपये

- दादर - पुणे रेल्वे स्टेशन - साधी बस - ३७ रुपये, निमआराम - ४६ रुपये, शिवशाही - ५३ रुपये, शिवनेरी - ७५ रुपये, शिवाई - ५४ रुपये

- अलिबाग - मुंबई - साधी बस - २२ रुपये, निमआराम - ३२ रुपये, शिवशाही - ३४ रुपये, शिवनेरी - ५२ रुपये, शिवाई - ३७ रुपये

- दापोली - मुंबई - साधी बस - ५३ रुपये, निमआराम - ६८ रुपये, शिवशाही - ७६ रुपये, शिवनेरी - ११४ रुपये, शिवाई - ८० रुपये

- मुंबई - कोल्हापूर - साधी बस - ८९ रुपये, निमआराम - ११८ रुपये, शिवशाही - १२८ रुपये, शिवनेरी - १८८ रुपये, शिवाई - १३२ रुपये

- मुंबई - सांगली - साधी बस - ८९ रुपये, निमआराम - १२१ रुपये, शिवशाही - १२७ रुपये, शिवनेरी - १८८ रुपये, शिवाई - १३२ रुपये

- पुणे (श.नगर) - छ.सं. नगर - साधी बस - ५३ रुपये, निमआराम - ६८ रुपये, शिवशाही - ७६ रुपये, शिवनेरी - ११४ रुपये, शिवाई - ८० रुपये

- नाशिक - कोल्हापूर - साधी बस - १०५ रुपये, निमआराम - १३७ रुपये, शिवशाही - १५१ रुपये, शिवनेरी - २२० रुपये, शिवाई - १५८ रुपये

- पुणे (स्वारगेट) - सोलापूर - साधी बस - ५८ रुपये, निमआराम - ७४ रुपये, शिवशाही - ८१ रुपये, शिवनेरी - १२१ रुपये, शिवाई - ८७ रुपये

- पुणे (शि.नगर) - नागपूर - साधी बस - १६७ रुपये, निमआराम - २२४ रुपये, शिवशाही - २४० रुपये, शिवनेरी - ३५६ रुपये, शिवाई - २५३ रुपये

अशी असेल टॅक्सी-रिक्षाची दरवाढ

- काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) किमान देय प्रति १.५ किमी भाडे २८ रुपयांवरून ३१ रुपये.

- कुलकॅबसाठी किमान देय प्रति १.५ किमी भाडे ४० रुपयांवरून ४८ रुपये. भाडेदरात २० टक्के वाढ.

- ऑटोरिक्षा (सीएनजी) किमान देय प्रति १.५ किमी भाडे २३ वरून २६ रुपये.

- मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रात १ फेब्रुवारी २०२५ पासून भाडेवाढ लागू.

- जे टॅक्सी व ऑटोरिक्षा परवानाधारक सुधारित भाडेदरानुसार भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करून घेतील, त्यांनाच ही भाडेवाढ लागू.

- भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन १ फेब्रुवारीपासून ३० एप्रिलपर्यंत करून घेणे आवश्यक राहील.

या कारणांमुळे भाडेवाढ

यापूर्वी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडेदर सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर इत्यादी बाबीत वाढ झाल्यामुळे प्राधिकरणाने काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडे दरवाढ करण्याचा निर्णय घेतला.

logo
marathi.freepressjournal.in