बेरोजगार संस्थांना आता व्यवसायाची संधी! विनानिविदा १० लाखांपर्यंत कामाची उपलब्धता
मुंबई : राज्यात दोन हजारांहून अधिक बेरोजगार संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना आता विना निविदा प्रक्रिया राबवता १० लाखांपर्यंत कामे करण्याची संधी उपलब्ध केली आहे. बेरोजगार संस्थांच्या कामाचा आवाका वाढावा यासाठी विना निविदा प्रक्रिया राबवता कामे करण्याची संधी उपलब्ध केल्याची घोषणा महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवारी केली. दरम्यान, या आधी कामाची मर्यादा ३ लाखांपर्यंत होती, ती मर्यादा १० लाखापर्यंत केल्याचे लोढा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आजवर रोजगार निर्मितीसाठी महारोजगार मेळावे, पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सारख्या सर्वंकष योजना तयार झाल्या आहेत. आता बेरोजगार सेवा संस्थांना स्वतःच्या कामाचा आवाका वाढवता येईल, त्यातून नवीन संधी निर्माण होतील आणि पर्यायाने रोजगार निर्मिती होईल. रोजगार संपन्न समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा ठरेल, असे ही ते म्हणाले.
मर्यादा वाढविण्याच्या मागणीवर निर्णय
महाराष्ट्रात २०२३ अखेर २ हजार पेक्षा जास्त संस्था कार्यरत असून, त्यामध्ये ३५ हजार पेक्षा जास्त सदस्य आहेत. इतर संस्थांच्या तुलनेत बेरोजगार सेवा संस्थांना मिळणाऱ्या कामांची संख्या कमी असल्याने विना निविदा मिळणाऱ्या कामांची मर्यादा ३ लाखांपासून १० लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली गेली होती. त्यावर मंगल प्रभात लोढा यांनी ही घोषणा केली आहे.