

नागपूर : चंद्रपूर रोडवरील विस्तारित बुटीबोरी एमआयडीसीतील ‘अवाडा सोलर’ कंपनीत शुक्रवारी सकाळी चाचणी सुरू असताना पाण्याची टाकी फुटल्याने सहा कामगारांचा मृत्यू झाला. तर अनेक कामगार जखमी झाले आहेत. दीड लाख लिटर क्षमतेच्या महाकाय पाण्याच्या टाकीचा हायड्रो चाचणीदरम्यान झालेला स्फोट इतका भीषण होता की, यात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या तिघांचा कालांतराने मृत्यू झाला.
मृतांमध्ये सुधांशु कुमार नागेश्वर साहणी, (वय ३६, मुझप्परपूर बिहार), बुलेटकुमार इंद्रजीत शहा (वय ३०, रा. मिश्रोली, सुहानी पश्चिम चंपारण बिहार), शमीम अन्सारी (४२, रा. मुझप्परपूर, बिहार), प्रकाश बिल्ला सहानी (ग्राम गवसरा मुझाप्परपूर बिहार), अन्वर अन्सारी, मुक्तार अन्सारी यांचा समावेश आहे. हे सर्व कामगार बिहारमधील आहेत.
अन्य जखमीची नावे बाबूचंद प्रसाद, जाकीर हुसैन, इब्राहिम अन्सारी आणि नागपूरची मयुरी तुरक अशी आहेत. अवाडा कंपनीत झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना उपचाराकरिता बुटीबोरी येथील माया हॉस्पिटल येथे आणल्याचे कळताच जखमी कामगारांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.
शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कंपनीत नवनिर्मित मेटॅलिक वॉटर टँकची चाचणी (हायड्रो टेस्टिंग) सुरू होती. दीड लाख लिटर पाण्याचा दाब पेलण्याची क्षमता तपासली जात असताना अचानक एक कानठळ्या बसवणारा आवाज झाला. पाण्याच्या प्रचंड दाबाने टाकीचा स्फोट झाला आणि जवळपास काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पत्र्यांचा मलबा पडल्याने यात ३ कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत जखमी झालेले ३ जण मृत्यूशी झुंज देत होते. अन्य ४ कामगार जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अवाडा कंपनीत याआधीही ४ नोव्हेंबरला कैलास खुशबराव कैकाडी (वय ३७) या कामगाराचा फोर्कलिफ्टखाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यामुळे कंपनीच्या सुरक्षा ऑडिटवर प्रश्नचिन्ह कायम आहे. आज इतक्या मोठ्या क्षमतेच्या टाकीचे टेस्टिंग करताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले होते का, वारंवार अपघात होऊनही प्रशासन झोपेतच आहे का, आदी प्रश्न अनुत्तारितच आहेत.