अमित ठाकरेंची कार अडवल्याने मनसेने समृद्धीवरील टोलनाका फोडला

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन टोल नाक्यावरील केबिनची तोडफोड केली
अमित ठाकरेंची कार अडवल्याने मनसेने समृद्धीवरील टोलनाका फोडला

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे वाहन अडवून त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाका फोडला.

मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज ठाकरे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून नाशिकला असताना सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर अमित ठाकरे यांची कार टोलनाका कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाल्यानंतर अमित ठाकरेंची गाडी सोडून देण्यात आली होती. मात्र ही बाब मनसे कार्यकर्त्यांना समजताच ते टोलनाक्यावर धावून गेले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ते शांत झाले. मात्र पहाटे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास मनसैनिकांनी पुन्हा घटनास्थळी जात टोलनाका फोडला आहे.

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमित ठाकरेंचा ताफा मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी सिन्नरजवळील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार अडवण्यात आली. काही काळ अमित ठाकरेंना तिथे उभेदेखील राहावे लागले. फास्टटॅगच्या तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतर अमित ठाकरे तिथून निघून गेले. पण मनसे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रागाच्या भावनेतून या टोलनाक्याची तोडफोड केली.

टोलनाका कर्मचाऱ्यांनी अरेरावी आणि गैरवर्तन केल्याचा दावा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला असून या प्रकाराचा निषेध म्हणून हा टोलनाका फोडल्यात आला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन टोल नाक्यावरील केबिनची तोडफोड केली. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. या प्रकारामुळे टोल नाक्यावर बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले की, “राज ठाकरेंमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे त्यात अजून एकाची भर पडली.”

logo
marathi.freepressjournal.in