राहुल यांच्या कार्यक्रमांना गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली नाराजी?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला गुरुवारी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. इतकेच नव्हे, तर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सभेला कोणीही हजर नव्हते.
राहुल यांच्या कार्यक्रमांना गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली नाराजी?
Published on

सांगली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला गुरुवारी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. इतकेच नव्हे, तर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सभेला कोणीही हजर नव्हते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे विश्वजित कदम यांनी गेल्या आठवड्यातच स्पष्ट केले होते. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवाराचा पराभव केला होता. तसेच, मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर करण्याची विनंतीही काँग्रेसने अव्हेरल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या सांगलीतील अनुपस्थितीला महत्त्व दिले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून गुरुवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. मोदी यांनी छत्रपतींचा पुतळा कोसळल्याबद्दलच केवळ माफी मागू नये, तर नोटाबंदी, शेतकरीविरोधी विधेयके आणि चुकीच्या जीएसटीबद्दलही माफी मागितली पाहिजे, असेही गांधी म्हणाले. इतकेच नव्हे, तर पुतळा कोसळल्याबद्दल मोदी यांनी केवळ छत्रपतींचीच माफी मागू नये तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची माफी मागितली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राहुल गांधी यांच्या हस्ते येथे अनावरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी माफी का मागितली, तर पुतळा उभारण्याचे कंत्राट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुणवत्ता नसलेल्या व्यक्तीला दिले होते म्हणून की प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला म्हणून, असे सवाल गांधी यांनी केले. सर्व कंत्राटे अदानी आणि अंबानी यांना का दिली जातात आणि ते केवळ दोनच लोकांसाठी सरकार का चालवितात, याची उत्तरेही मोदी यांनी दिली पाहिजेत. शेतकरीविरोधी कायद्यांबद्दल मोदी यांनी माफी मागितली नाही, शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर कायदे मागे घेण्यात आले. त्यामुळे मोदी यांनी नोटाबंदी आणि चुकीच्या जीएसटीबद्दलही माफी मागावी, अशी मागणी गांधी यांनी केली. मणिपूरमध्ये यादवीसदृश स्थिती असतानाही मोदी तेथे फिरकले नाहीत. कारण भाजपनेचे ईशान्येकडील हे राज्य पेटत ठेवले आहे, असा आरोपही राहुल यांनी यावेळी केला. केवळ दोन जणांसाठी लघु आणि मध्यम उद्योगांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. अदानी, अंबानी समूह रोजगारनिर्मिती करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. दिवंगत पतंगराव कदम यांनी आपले आयुष्य काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र आणि देशासाठी समर्पित केले आणि विकासासाठी काम करून शिक्षणाचाही प्रसार केला. जेव्हा इंदिरा गांधी निवडणुकीत पराभूत झाल्या तेव्हा पतंगराव त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि रात्री २ वाजता जाहीर सभा आयोजित केली, याचाही गांधी यांनी उल्लेख केला.

...तर लाडक्या बहिणीला दरमहा २ हजार रुपये

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीत भाषण करताना राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहि‍णींना दरमहा दोन हजार रुपये देऊ, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जाहीर केले.

logo
marathi.freepressjournal.in