

लासलगाव : बाजारभावातील घसरणीचा फटका बसल्याने येवला तालुक्यातील शेतकरी गुलाबराव सोनवणे यांनी तीन एकर क्षेत्रातील उभ्या कोबीच्या पिकावर रोटावेटर फिरवला. सुमारे तीन लाख रुपये खर्च करून उभे केलेल्या पिकाला अवघा दोन रुपये किलो भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले. अखेर आधी जनावरांसाठी शेतात मेंढ्या सोडण्यात आल्या आणि त्यानंतर संपूर्ण पीक नष्ट करण्यात आले.
दुष्काळी परिस्थिती असतानाही सोनवणे यांनी पाण्याचे नियोजन करून तीन एकर क्षेत्रात कोबीची लागवड केली होती. रोपे, मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशके, निंदणी तसेच ट्रॅक्टरच्या मशागतीसाठी त्यांनी सुमारे तीन लाख रुपये खर्च केले. पीक काढणीला आल्यानंतर सुरुवातीला कोबीला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती.
सुरुवातीला कोबीला सुमारे साडेसहा रुपये किलोचा भाव मिळाला. त्यातून १२ टन कोबीची एक गाडी बाजारात पाठवून सोनवणे यांना सुमारे ८० हजार रुपये मिळाले.
मात्र, त्यानंतर बाजारात आवक वाढल्याने कोबीच्या दरात मोठी घसरण झाली. दर थेट दोन रुपये किलोपर्यंत खाली आल्याने उर्वरित पीक बाजारात पाठवणेही परवडेनासे झाले.
खर्च वसुलीचेही गणित बिघडले
मजुरी, खते, कीटकनाशके आणि मशागतीचा खर्च पाहता दोन रुपये किलोचा दर अत्यंत कमी असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे अशक्य झाले. त्यामुळे सोनवणे यांनी उभ्या पिकातून काहीच आर्थिक फायदा होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर आधी कोबीच्या शेतात मेंढ्या सोडल्या. त्यानंतर रोटावेटरच्या साहाय्याने उर्वरित संपूर्ण पीक नष्ट केले. भाजीपाला पिकांना शाश्वत बाजारपेठ आणि हमीभावाची व्यवस्था नसल्याने आवक वाढली की बाजारभाव कोसळतात. त्याचा थेट फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. तीन एकर कोबीवर मोठा खर्च करूनही दोन रुपये किलोचा भाव मिळत असल्याने अखेर पीक नष्ट करण्याची वेळ आल्याची व्यथा सोनवणे यांनी व्यक्त केली.
बाजारभावाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करता येत नाही. भाजीपाला पिकांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आवक वाढली की दर मोठ्या प्रमाणात घसरतात. तीन एकर कोबीवर मोठा खर्च केला; मात्र आता दोन रुपये किलोनेही खरेदीदार मिळत नाही. त्यामुळे मेंढ्या सोडून पीक नष्ट करण्याची वेळ आली.
गुलाबराव सोनवणे, शेतकरी