मंत्रिमंडळ विस्ताराचे पुन्हा वेध ;अधिवेशन संपताच विस्ताराचा मुहूर्त

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात मंत्रिपदाचे वाटप झालेले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचे पुन्हा वेध ;अधिवेशन संपताच विस्ताराचा मुहूर्त

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त साधला जाण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामिल झाल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजप, शिंदे गटाच्या काही नेत्यांना मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. किमान अखेरच्या क्षणी का होईना मंत्रिपद मिळेल, अशी अनेकांना आशा आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वाईचे आमदार मकरंद पाटील हेही मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनाही या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीच्या सरकारमध्ये सामिल झाला, त्यावेळी नऊ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली होती. त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे वाटत असताना कोणत्या ना कोणत्या कारणावरून मंत्रिमंडळ विस्तार लांबतच गेला. आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरविण्यात आल्याचे महायुतीतील सूत्रांचे म्हणणे आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात मंत्रिपदाचे वाटप झालेले आहे. त्यामुळे अधिवेशन पार पडताच नवीन वर्षाच्या आत किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांत हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तीन पक्षांचे सरकार असल्याने भाजपमध्येही अनेकांचे मंत्रिपद हुकलेले आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कोणाची वर्णी लागते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे शिंदे गटातही अनेकांना मंत्रिपदाचे आश्वासन देऊन गटात सामिल करून घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बऱ्याच नेत्यांना मंत्रिपद हवे आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे संतुलन राखतात, हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर कळेल.

मंत्रिपदे थोडकी, दावेदार अनेक

राज्यात महायुतीतील तीन पक्षांचे सरकार आहे आणि तिन्ही पक्षांत दिग्गज नेते आहेत. त्यामुळे भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात अनेक दावेदार आहेत. भाजपची लिस्ट तर फार मोठी आहे. कारण अनेक नावे चर्चेत असताना मित्रपक्षांच्या नेत्यांना संधी देण्यासाठी माघार घेण्याची वेळ आली. तसेच शिंदे गटात भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, आता मंत्रिपदे बोटावर मोजण्याइतकी आहेत आणि दावेदार अनेक आहेत. त्यामुळे आता नेमकी कोणाला लॉटरी लागणार, हे पाहावे लागणार आहे.     

 राष्ट्रवादीत मकरंद पाटील यांचे नाव

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात मंत्रिपदाचे दावेदार अनेक आहेत. मात्र, अजित पवार गटाचे सूत्र ठरलेले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील वाई-खंडाळा मतदारसंघातील आमदार मकरंद पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. आमदार मकरंद पाटील अगोदर शरद पवार गटासोबत होते. मात्र, त्यानंतर शरद पवार गटाची साथ सोडत अजित पवार गटात सामिल झाले. आ. पाटील हे सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊन सातारा जिल्ह्यात आपला गड मजबूत करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात मकरंद पाटील यांना लॉटरी लागू शकते.

logo
marathi.freepressjournal.in