मंत्रिमंडळ विस्तार उद्या; नागपुरात होणार शपथविधी सोहळा, ३० मंत्री घेणार शपथ

राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार शनिवारऐवजी रविवारी होणार आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपुरात होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यावेळी सुमारे ३० मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचे समजते.
मंत्रिमंडळ विस्तार उद्या; नागपुरात होणार शपथविधी सोहळा, ३० मंत्री घेणार शपथ
Published on

मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार शनिवारऐवजी रविवारी होणार आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपुरात होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यावेळी सुमारे ३० मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचे समजते.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत असल्याने आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी नव्हे तर रविवारी होणार आहे. दरम्यान, तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा रविवारी दुपारी ४ वाजता राजभवन, नागपूर येथे होणार आहे.

नव्या मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी, १४ डिसेंबर किंवा रविवारी, १५ डिसेंबर रोजी घ्यावा का, याबाबत नेत्यांमध्ये संभ्रम होता. आधी प्रोटोकॉल विभागाने मुंबईत शनिवारी शपथविधीच्या तयारीचे नियोजन केले होते. मात्र, उशिरापर्यंत राजभवनाकडे कोणताही अधिकृत संदेश पाठवण्यात आला नाही, परिणामी हा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. नगरविकास, पर्यटन आणि एमएसआरडीसी यासारखी महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, महसूल खात्याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.

भाजपकडे गृह, गृहनिर्माण, ऊर्जा, ग्रामीण विकास आणि पर्यावरण यासारखी खाती राहण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (अजित पवार) अर्थ, सहकार, कृषी, महिला आणि बालविकास ही खाती राहतील. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खात्यांमध्ये लहानसहान बदल होण्याची शक्यता व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्यामुळे काही खात्यांमध्ये बदल अपेक्षित आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ४३ मंत्रिपदे असतील. निवडणूक निकालांनुसार, भाजपला १३२ जागा, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४१ जागा मिळाल्या. त्यानुसार, भाजपला २१, शिवसेनेला १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

भाजपकडून काही प्रमुख नेत्यांशिवाय नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेत जास्तीत जास्त आमदारांना समाधानी ठेवण्यासाठी मंत्रिपदे दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत फिरवली जातील, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र, काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, पण बहुतेक मागील मंत्री परत येण्याची शक्यता आहे.

५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्ताराची सत्ताधारी आमदारांना प्रतीक्षा आहे.

एकनाथ शिंदेंनी घेतली फडणवीस यांची भेट

खातेवाटपावरून अडून बसलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री ‘सागर’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून खातेवाटपाबाबत अंतिम चर्चा केल्याचे सांगण्यात येते.

यांना मिळणार मंत्रिपद

भाजप

सुधीर मुनगंटीवार

गिरीश महाजन

राधाकृष्ण विखे-पाटील

आशिष शेलार

रवींद्र चव्हाण

शिवसेना (शिंदे गट)

उदय सामंत

गुलाबराव पाटील

दादा भुसे

दीपक केसरकर

शंभूराज देसाई

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

धनंजय मुंडे

दिलीप वळसे-पाटील

छगन भुजबळ

अदिती तटकरे

logo
marathi.freepressjournal.in