अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासह जिल्हा काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्व आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे नांदेडमधील काँग्रेस आमदार आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासह जिल्हा काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट

भास्कर जामकर/नांदेड

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्व आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे नांदेडमधील काँग्रेस आमदार आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तसेच त्यांच्या शिवाजीनगर येथील ‘आनंद निलयम’ या निवासस्थानासह नवा मोंढा येथील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयातही शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. महापालिका असो किंवा जिल्हा परिषद, नेहमीच काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, विविध सोसायटीवरही काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे काही बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी जमले होते. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपण टीव्हीवर पाहिल्यावरच समजले असून, ते आल्यावरच प्रतिक्रिया देण्यात येईल, असे सांगितले. तर सुरजितसिंग गिल, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास टाळले.

‘जिसका डर था, वहीं हो गया’, असाही सूर पदाधिकाऱ्यांमधून उमटत होता, तर नवीन मोंढा येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर पण बोटावर मोजण्याइतकेच काही कार्यकर्ते जमले होते. काँग्रेसचे माजी नगरसेवक नवल पोकर्णा यावेळी म्हणाले की, “आम्ही सर्वजण अस्वस्थ आहोत.” आरिफ खान म्हणाले, “साहेबांशी चर्चा झाल्यावर पुढे काय ते ठरवू.” अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील ‘आनंद निलयम’ निवासस्थानीही शुकशुकाट पाहायला मिळाला. सोमवारी दिवसभर सर्वत्र अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याचीच चर्चा होती.

चव्हाण काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह मिळवणार काय? -संजय राऊत

अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते महाविकास आघाडीसोबत होते. जागावाटपाची चर्चा करत होते. आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाणसुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

लोकशाही वाचविण्यासाठी लढू -नाना पटोले

काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत, हे दुर्दैवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकूमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

नेत्यांना फोडणे भाजपची युक्ती -प्रणिती शिंदे

राजकीय नेत्यांना फोडणे, ईडीसारख्या चौकशा लावणे, ही भाजपची युक्तीच आहे. माझ्याबाबतही अफवा पसरवल्या जात आहेत. आम्ही काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. आमच्याकडे ईडीची चौकशी होण्यासारखे काहीही नाही. अशोक चव्हाणांसोबत भाजपने माइंड गेम खेळला. ईडीच्या चौकशा आणि दबाव यामुळे अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतला. अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आहे. चव्हाण साहेबांनी जो काही निर्णय भीतीपोटी घेतला असेल तो काँग्रेससाठी अतिशय दुर्दैवी आहे. या पद्धतीचे राजकारण आपल्या देशात किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. पण भारताची नागरिक म्हणून ज्याच्यासाठी माझी जी तत्त्वे आहेत, ज्याच्यासाठी मी राजकारणात आले, ती तत्त्वे यापुढेही पाळणार आहे, असे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.

भाजपने ब्लॅकमेलिंग करून फोडले -यशोमती ठाकूर

अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ‘ब्लॅकमेलिंग’ करून भाजपने फोडले. भाजपने कितीही प्रयत्न केले, दबाव टाकून नेत्यांना ओढण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता मात्र भाजप आणि अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितच थारा देणार नाही. आम्‍ही जेथे आहोत, तेथेच आहोत. केंद्र सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे नाव आल्यानंतर त्यांनी दिलेला हा राजीनामा कशाचे लक्षण आहे हे स्पष्ट होते. अशोक चव्हाण यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दबाव होताच, मात्र अखेरीस त्यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून राजीनामा द्यायला भाग पाडले आहे. स्वतःच्या पक्षाची ताकद आणि प्रतिमा दोन्ही उतरणीला लागल्यामुळे भाजप अशा पद्धतीचे डाव खेळत आहे. अत्यंत विकृत पद्धतीच्या या राजकारणाचा शेवट येत्या निवडणुकीत सुज्ञ मतदारांकडून निश्चितच केला जाईल, याची आम्हाला खात्री आहे, असे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

मतदारच धडा शिकवेल -वडेट्टीवार

“माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे. त्यांनी अचानक निर्णय घेण्यामागचे कारण अजूनही स्पष्ट नाही. त्यांची कोणाशी चर्चा झाली किंवा नाही, याबाबत आपल्याला कल्पना नाही. पण त्यांची माझ्याशी चर्चा झालेली नाही. त्यांच्याबरोबर १६ वर्षांपासून आपण काम केले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात एकदा नव्हे तर दोनदा होतो. त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि त्यामुळे कदाचित चव्हाण यांनी पक्षांतर केल्यास वडेट्टीवारदेखील करतील, अशा वावड्या उठवल्या जात असतील. परंतु स्पष्टपणे सांगू इच्छितो, यात काही तथ्य नाही. चव्हाण हेच त्यांच्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करू शकतील. मात्र, मधल्या काळात त्यांच्यामागे अनेक चौकशींचा फेरा लागल्याची माहिती होती. परंतु ती चौकशी नेमकी कशाची होती, हे काही कळले नाही. पण, ज्या पद्धतीने भाजप पक्ष फोडण्याचे आणि इतर पक्षांचे नेते पळवण्याचे काम करत आहे, या प्रकाराला जनता कंटाळलेली आहे. मतदार या फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागला असून येत्या निवडणुकीत अशा प्रवृत्तींना नक्कीच धडा शिकवेल,” असा विश्वास काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही -निरूपम

अशोक चव्हाण हे मुळातच महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर खूप नाराज होते, याची माहिती त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला दिली होती. त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती. अशोक चव्हाण हे कुशल संघटक, जमिनीवर पक्की पकड असलेले नेते आहेत. गेल्या वर्षी जेव्हा भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये पाच दिवसांसाठी होती, तेव्हा संपूर्ण नेतृत्वाने त्यांची क्षमता प्रत्यक्ष पाहिली होती. त्यांचे काँग्रेस सोडणे हे आमचे मोठे नुकसान आहे. त्याची भरपाई कोणीही करू शकणार नाही, असे माजी खासदार संजय निरूपम यांनी सांगितले.

तरुणांना खूप मोठी संधी -जितेंद्र आव्हाड

“पक्षातून नेते बाहेर जात आहेत, त्यामुळे पक्ष कमजोर होत नसून तरुणांना चांगली संधी निर्माण झाली आहे. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये इंदिरा गांधी विरुद्ध सर्व अशी एक लढाई झाली होती. या लढाईत इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव झाला. हळूहळू सगळ्यांनीच त्यांची साथ सोडायला सुरुवात केली. पण, संजय गांधी यांच्या नेतृत्वाखालील युवकांनी रिकाम्या जागा भरण्यासाठी एक नवीन फळी निर्माण केली. त्याचा परिपाक म्हणजे १९८० साली ३०० च्या वर जागा जिंकून इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. नेते सोडून गेल्याने पक्ष रसातळाला गेला, असे कधीच होत नाही. पक्षाचा ‘मणका’ म्हणजे कार्यकर्ते असतात अन् त्यातल्या त्यात तरुण मुले आणि मुली असतात. शेवटी रस्त्यावर येऊन लढण्याचे काम हे तरुण कार्यकर्तेच करीत असतात. किंबहुना जवळपास सर्वच आंदोलनात या तरुण कार्यकर्त्यांचाच अधिक सहभाग असतो. हे राज्य, या राज्याचे बिघडलेले राजकारण, बिघडलेली सामाजिक अवस्था, सुसंस्कृत राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आणि लोकशाहीची होत असलेली गळचेपी यातून मार्ग काढण्याची ताकद आणि हिंमत त्यांच्यातच आहे. तरुणांनो, तयार राहा. पुढचा महाराष्ट्र आणि पुढचा भारत तुमच्या हातातच असेल,” असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर केले आहे.

काँग्रेसचे मोठे नुकसान -सतेज पाटील

काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील म्हणाले की, “अशोक चव्हाण यांच्यासारखे नेतृत्व काँग्रेसमधून जाणे हे मोठे नुकसान आहे. आम्ही तरुण काँग्रेसच्या विचारांचा झेंडा पुढे घेऊन जाऊ. अशोक चव्हाण यांची काँग्रेस सोडण्याची भूमिका काय, याबाबत मला माहिती नाही. मी सकाळपासून २० ते २२ आमदारांशी बोललो. काँग्रेस आमदार जाणार यामध्ये काहीही तथ्य नाही. राज्यात काँग्रेससाठी चांगले वातावरण असल्यानेच आपण एकत्र लढू, अशी आमदारांची भूमिका आहे. काँग्रेसला जास्त जागा मिळतील, असा सर्व्हे आला. त्यामुळे कुठेतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही एकत्र राहिल्याने महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in