बछड्यांची आईशी पुनर्भेट! कराड वन विभागाच्या पथकाला यश

या आढळून आलेल्या बछड्यांची त्यांच्या मादी आईशी पुनर्भेट घडवून आणण्यास कराड वन विभागाच्या पथकाला यश आले.
बछड्यांची आईशी पुनर्भेट! कराड वन विभागाच्या पथकाला यश

कराड : मालखेड ता. कराड येथील कूळकी नामक शेत शिवारातील रामचंद्र ज्ञानू मोरे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना गुरुवारी सायंकाळी मजुरांना दोन बिबट्याचे बछडे आढळून आले होते. या आढळून आलेल्या बछड्यांची त्यांच्या मादी आईशी पुनर्भेट घडवून आणण्यास कराड वन विभागाच्या पथकाला यश आले. मादी बिबट्या व बछड्यांची पुनर्भेट झाल्याने बछडे आपल्या आईच्या कुशीत विसावल्याने प्राणी मित्रांमधून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

मालखेड येथील कुळकी नावाच्या शेत शिवारातील रामचंद्र ज्ञानू मोरे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना गुरुवारी (१५ फेब्रु) रोजी सायंकाळच्या सुमारास मजुरांना ऊसाच्या सरीत बिबट्याची दोन बछडे निदर्शनास आले. मजुरांनी याबाबतची माहिती शेत मालक रामचंद्र मोरे यांना दिली असता, त्यांनी तत्काळ सरपंच इंद्रजित ठोंबरे यांना याबाबत माहिती दिली. इंद्रजीत ठोंबरे यांनी लगेच कराड येथील वन विभागाच्या कार्यालयातील वनपाल आनंद जगताप यांना फोनद्वारे सांगितले. वन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही बछडे ताब्यात घेतली. या बछड्यांची मादी बिबत्याशी पुनर्भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

काही दिवसांपूर्वी मालखेड येथेच याच शेत शिवरापासून केवळ ८०० मीटर अंतरावर दोन बछडे सापडले होते, त्यांचे त्याच दिवशी मादी सोबत पुनर्भेट घडवून आणण्यात वनविभाग यशस्वी झाला होता. त्यामुळे याही बछड्यांची आईशी पुनर्भेट घडवून आणण्याची शक्यता बळावली होती. तसेच मादी बिबट्या त्या दरम्यान शेजारी असल्याची खात्री वनविभागाला होती. त्यामुळे वनविभागाने येथील वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स यांच्या पथकाला पाचारण केले. बछडे सापडलेल्या ठिकाणी विशेष कॅमेरे लाऊन बछडे क्रेटमध्ये ठेवण्यात आली. मादी रात्री ११वाच्या सुमारास दोनवेळा बछड्यांजवळ घुटमळून गेली होती. शेवटी मध्यरात्री १२वाच्या सुमारास पुन्हा आली व दोन्ही बछडे सुखरूप घेऊन गेली. कराड वन विभाग व वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स टीमने यशस्वीपणे पुनर्भेट घडवून आणल्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

सदर पुनर्मिलनासाठी कराडचे वनपाल आनंद जगताप, वनरक्षक कैलास सानप, अभिजित शेळके वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स टीमचे रोहीत कुलकर्णी, गणेश काळे, अजय महाडीक, रोहीत पवार, सचिन मोहिते, अनिल कोळी या सर्वांनी मोलाची भूमिका पार पाडली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in