भाजप खासदार बोंडेंविरोधात गुन्हा, राहुल गांधींविरुद्धचे विधान भोवले

राहुल गांधींच्या जिभेला चटके देण्याची भाषा करणारे अमरावतीचे भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भाजप खासदार बोंडेंविरोधात गुन्हा, राहुल गांधींविरुद्धचे विधान भोवले
IANS, File
Published on

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केलेले आक्षेपार्ह विधान त्यांच्याच अंगलट आले आहे. राहुल गांधींच्या जिभेला चटके देण्याची भाषा करणारे अमरावतीचे भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अमरावती पोलिसांनी बोंडे यांच्याविरुद्ध कलम १९२, ३५१(२) आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना आरक्षण रद्द करण्याबाबत विधान केल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया राजकीय पटलावर उमटली. यातूनच राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी, राहुल यांची जीभ छाटण्याची भाषा केली होती. पाठोपाठ भाजपचे अमरावतीतील खासदार अनिल बोंडे यांनी, राहुल यांची जीभ छाटण्याऐवजी चटके द्यायला हवे, असे वादग्रस्त विधान केले.

याबाबत काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून देशभरात निदर्शने व आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. महायुतीच्या नेत्यांविरोधात काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

लोकप्रतिनिधींच्या पदाबद्दल शंका - थोरात

संजय गायकवाड हे आमदार आहेत, याबद्दल शंका येते, असे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात चिखलफेक केली आहे, असेही ते म्हणाले. फडणवीस आणि शिंदे यांच्या नेत्यांची कृती ही राज्याच्या राजकीय संस्कृतीवर कलंक ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

बोंडेंना अटक करा – यशोमती ठाकूर

बोंडेंच्या विधानामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचे नमूद करत बोंडेंना तात्काळ अटक करण्याची मागणी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. बोंडे यांचे विधान समाजामध्ये गांधी यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून लोकमानसातून राहुल यांच्यावर हल्ला व्हावा याकरिता उद्युक्त करणारे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ठाकूर यांनी बुधवारी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना घेरावही घातला.

धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा : नाना पटोले

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरिक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. या संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधांना पत्रही लिहिले आहे. मात्र अद्याप कारवाई झाली नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in