
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. "राणा दाम्पत्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहेत," असे राज्य सरकारने न्यायालयात सांगितले. राणा दाम्पत्याने, "आमच्याविरोधातील गुन्हा रद्द व्हावा," अशी मागणी केली होती. त्यावर मुंबई पोलिसांनी सविस्तर उत्तर दिले आहे.
अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी, 'दाखल केलेली याचिका खोट्या एफआयआरवर आधारित होती,' असा दावा केला होता. हा दावा मुंबई पोलिसांनी फेटाळला. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ एप्रिलला होणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना राणा दाम्पत्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी दोघांना खार पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी मुंबईतील वातावरण चांगलेच तापले होते. त्यांना रोखण्यासाठी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी तळ ठोकला होता.