Video : मतदान केंद्रावर पोलिसांना शिवीगाळ करणं भोवलं, भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

मतदान केंद्रावरील पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखलX- Rohit Pawar
Published on

भिवंडी : महाराष्ट्रात सोमवारी (२० मे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडलं. मुंबईतील सहा जागांसह महाराष्ट्रातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघात मतदान झालं. दरम्यान मतदानादिवशी मतदान केंद्रावर पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्याला केली होती शिवीगाळ-

सोमवारी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान झालं. यात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कपिल पाटील तर मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बाळ्यामामा म्हात्रे तसेच वंचित बहुजन आघाडीकडून निलेश सांबरे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान मतदानादिवशी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर कपिल पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिल पाटील यांच्यावर कलम १८६, ५०४, ५०६ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित पवारांनी केला व्हिडीओ शेअर-

भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी मतदान केंद्रावर पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स (पूर्वीचे ट्वीटर) पोस्टच्या माध्यमातून शेअर केला होता.

रोहित पवार म्हणाले की, "केंद्रीयमंत्री राहिलेले भिवंडी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर शिव्या देतात. अशाप्रकारची मस्ती भाजप नेत्यांच्या अंगात येतेच कुठून, असा प्रश्न पडतो. कदाचित सागर बंगल्यावर बसलेल्या त्यांच्या बॉसचे विशेष संरक्षण असल्याने ही मस्ती येत असावी. असो, पण हा अहंकार आणि सत्तेची मस्ती चार जूनला उतरल्याशिवाय राहणार नाही!"

logo
marathi.freepressjournal.in