वडेट्टीवार, बावनकुळे यांच्याविरोधात गुन्हे दाखल

मुंबईतील २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या नाही तर रा. स्व. संघ समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीमुळे झाला होता, असे विधान राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते.
वडेट्टीवार, बावनकुळे यांच्याविरोधात गुन्हे दाखल

प्रतिनिधी/मुंबई

मुंबईतील २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या नाही तर रा. स्व. संघ समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीमुळे झाला होता, असे विधान राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानाप्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच भाजपने तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? अशी जाहिरात केली होती. याप्रकरणी काँग्रेसकडून तक्रार झाल्यानंतर या प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पक्षाची ही जाहिरात असल्याने नियमाप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णीदेखील होते. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात पैसे वाटप करण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाब याच्या गोळीने नाही तर संघ समर्थक असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने मारलेल्या गोळीने झाला होता, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले होते. माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला देऊन त्यांनी हे विधान केले होते. या माध्यमातून त्यांनी भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांना लक्ष्य करायचे होते. या प्रकरणी आता नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “भाजपकडून मागील आठवड्यात प्रमुख माध्यमांमध्ये दिलेल्या जाहिरातीत पाकिस्तानचा उल्लेख केला होता. तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? अशी ती जाहिरात होती. याप्रकरणी काँग्रेसकडून तक्रार झाल्यानंतर आयोगाने ठाण्यात गुन्ह्यात दाखल करण्यात आला,” अशी माहिती किरण कुलकर्णी यांनी दिली.

बारामतीतही गुन्हे दाखल

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या प्रकरणीदेखील चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वसामान्य जागरूक नागरिकांनी जर अशा प्रकारे कुठेही आचारसंहिता भंगाचे गुन्हे घडत असतील तर त्यांनी तातडीने संबंधित यंत्रणेला कळवावे. त्यासाठी सी-व्हिजिल ॲॅपदेखील सर्वसामान्यांना उपलब्ध असल्याचे एस. चोक्कलिंगम आणि किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in