
वाधवान कुटुंबियांच्या महाबळेश्वर येथील बंगल्यावर सीबीआयने छापा टाकला असून बंगल्यातील कोट्यवधी रूपये किंमतीची परदेशी चित्रे, पोर्टेट सील करून ताब्यात घेण्यात आली आहेत. शनिवारी दुपारी बारा वाजल्यापासून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई सुरू केली होती.
महाबळेश्वर येथे पाच एकर जागेवर कपिल आणि धीरज वाधवान यांचा बंगला असून कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये वाधवान बंधूंनी तत्कालिन प्रधान सचिव राकेश गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वरमध्ये प्रवेश घेतला होता. तेव्हापासून वाधवान बंधू ईडीच्या ताब्यात आहेत. सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. बंगल्यात असलेली कोट्यवधी रुपयांची परदेशी पेंटिंग्ज, पोर्टेट कुठून आणली, याची माहिती घेण्यात येत आहे. या कारवाईबाबत पोलीस व सीबीआयने गुप्तता बाळगली असून शनिवारी दुपारपासून ही कारवाई सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बंगल्याची दोन ते अडीच तास झाडाझडती घेण्यात आली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या हाताला काय लागले, याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.