जळगाव : अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत घ्यावा यासाठी केंद्रीय जल आयोगाकडे सादर केला असून त्या प्रस्तावाला येत्या काही दिवसात मान्यता देण्याचे केंद्रीय जल आयोगाचे चेहरमन कुशवेंद्र वोहरा यांनी आश्वासित केल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
बुधवारी दिल्लीतील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात जाऊन चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांची मदत व पुनर्वसन मंत्री अनिल यांनी भेट घेतली. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये या धरणाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत त्यांच्याशी आज त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली. या प्रस्तावास केंद्रीय जल आयोगाची मान्यता लवकरात लवकर प्रदान केली जाईल असे वोहरा यांनी आश्वासित केले. या बैठकीस केंद्रीय जल आयोगाचे वरिष्ठ अधिकारी व मुख्य अभियंता उपस्थित होते अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. पाडळसे प्रकल्पाबाबत नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाशी सकारात्मक चर्चा सुरू असून जागेच्या दर निश्चितीसाठी कृषी विभागाबरोबरही चर्चा सुरु आहे. त्यातून लवकरात लवकर सकारात्मक मार्ग निघेल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.