वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यास केंद्र सरकार जबाबदार - शरद पवार

“पंतप्रधानांचे हे आमिष म्हणजे एका घरात एका लहान मुलाला एक फुगा दिला, दुसऱ्या मुलाच्या हट्टानंतर त्याला त्याहून मोठा फुगा देऊ असे सांगण्यासारखे
वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यास केंद्र सरकार जबाबदार - शरद पवार

“वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाऐवजी राज्यात दुसरा मोठा प्रकल्प आणण्याचे आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखे आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे,” अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी केली.

“पंतप्रधानांचे हे आमिष म्हणजे एका घरात एका लहान मुलाला एक फुगा दिला, दुसऱ्या मुलाच्या हट्टानंतर त्याला त्याहून मोठा फुगा देऊ असे सांगण्यासारखे आहे,” अशी मिश्कील टिपणीही त्यांनी केली. “राज्यात सध्या नुसते वाद उकरून काढले जात आहेत. त्याऐवजी विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्र येऊन राज्याचा विकास कसा होईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत,” असेही पवार म्हणाले. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. या वादावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना, हा प्रकल्प राज्याबाहेर जाणे हे दुर्दैवी असल्याचे सांगितले.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, “पूर्वी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हीच पहिली पसंती होती. त्यावेळेचे राज्यकर्ते हे द्रष्टे होते. त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यात मोठी गुंतवणूक यायची; मात्र आता राज्यात येणारे प्रकल्पदेखील बाहेर नेले जात आहेत, हे राज्य सरकारचे अपयश आहे. या प्रकल्पाला तळेगाव येथील जागा ही योग्य होती. कारण तळेगावजवळच चाकण आणि रांजनगाव हा ऑटोमोबाइल हब आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणी झाला असता तर कंपनीलाही ते फायदेशीर ठरले असते. हा प्रकल्प राज्यातून बाहेर जाणे हे दुर्दैवी आहे. आता मोदी हे या प्रकल्पाऐवजी दुसरा प्रकल्प राज्याला देऊ असे म्हणत आहेत. हे आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखे आहे.”

“वेदांत प्रकल्प आता महाराष्ट्रात येणे शक्य नाही. ठाकरे सरकारवर याचे खापर फोडणे अयोग्य आहे. फॉक्सकॉनच्या बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाला अर्थ नाही. हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणला तर मोदींचे स्वागत करू,” असेही पवार म्हणाले. “केंद्राची सत्ता हाती असण्याचे अनुकूल परिणाम काही राज्यांवर होत असतात. केंद्राची सत्ता हातात याचा लाभ जर गुजरातला मिळत असेल तर आपण तक्रार करून काहीही होणार नाही. केंद्रात मोदी आणि अमित शहा हे सत्तेत आहेत. आपण पाहिले तर कुठल्याही माणसाला आपल्या घरची जास्त ओढ असते,” असे मतदेखील यावेळी पवार यांनी मांडले.

हे शहाणपणाचे लक्षण नाही

“मागच्या सरकारच्या काळात या प्रकल्पासंदर्भात निर्णय घेतला नाही. त्यासाठी उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे, असा आरोप होत आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत आणि एकनाथ शिंदे हे मंत्री होते. हे दोघे ज्या मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रिमंडळाने दुर्लक्ष केल्याचे आरोप तेच करीत आहेत. मला वाटतं हे शहाणपणाचे लक्षण नाही,” असा टोला शरद पवार यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in