धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे जाणाऱ्या अनुयायांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २४ विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai : मध्य रेल्वेच्या २४ विशेष गाड्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान विशेष गाड्या धावणार
Mumbai : मध्य रेल्वेच्या २४ विशेष गाड्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान विशेष गाड्या धावणार
Published on: 

मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे जाणाऱ्या अनुयायांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २४ विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक रोड, अकोला आणि भुसावळ या स्थानकांना नागपूरशी जोडणाऱ्या या गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने नागपूरमधील दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी येतात. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे सेवांचे नियोजन केले आहे. मध्य रेल्वेच्या नियोजनानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते नागपूरदरम्यान चार अनारक्षित विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. याशिवाय १८ आणि २० ऑक्टोबरला नाशिक रोडहून, तर १९ आणि २१ ऑक्टोबरला नागपूरहून मेमू विशेष गाड्या धावतील. पुणे-नागपूरदरम्यान चार, नागपूर-भुसावळदरम्यान चार, नागपूर-अकोलादरम्यान चार, तर सोलापूर-नागपूरदरम्यान दोन विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सीएसएमटी-नागपूर मार्गावर १८ ऑक्टोबरपासून आणखी एक जोडी विशेष गाड्यांची धावणार आहे.

या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. गाड्यांच्या प्रकारानुसार स्लीपर, सामान्य द्वितीय श्रेणी तसेच आरक्षित डब्यांची व्यवस्था असेल.

नागपूर-अकोला विशेष गाड्यांचे आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच [आयआरसीटीसीच्या संकेत-स्थळावर](https://www.irctc.co.in) सुरू आहे. अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणालीद्वारे तसेच RailOne ॲपवरून तिकिटे काढता येतील. गाड्यांच्या थांब्यांवरील वेळा जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी [भारतीय रेल्वेच्या चौकशी संकेतस्थळाला](https://enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी किंवा एनटीईएस ॲपचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in