कोकणात जाण्यासाठी दररोज ४६ गाड्या उपलब्ध; मनसेच्या शिष्टमंडळासोबत मध्य रेल्वेची बैठक

दादर-रत्नागिरी गाडी दिवा स्थानकातून चालविण्यात येत असल्याने विविध संघटनांकडून रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्रवाशांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे प्रशासनाने कोकणात जाण्यासाठी दररोज ४६ गाड्या उपलब्ध असल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली.
कोकणात जाण्यासाठी दररोज ४६ गाड्या उपलब्ध; मनसेच्या शिष्टमंडळासोबत मध्य रेल्वेची बैठक
कोकणात जाण्यासाठी दररोज ४६ गाड्या उपलब्ध; मनसेच्या शिष्टमंडळासोबत मध्य रेल्वेची बैठक
Published on

मुंबई : दादर-रत्नागिरी गाडी दिवा स्थानकातून चालविण्यात येत असल्याने विविध संघटनांकडून रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्रवाशांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे प्रशासनाने कोकणात जाण्यासाठी दररोज ४६ गाड्या उपलब्ध असल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली.

दादर-रत्नागिरी गाडी कोरोनानंतर २०२१ मध्ये दादर स्थानकावरून दिवा स्थानकामध्ये शिफ्ट करण्यात आली. दिवा स्थानकामध्ये क्रॉसिंग करत असताना इतर लोकल ट्रेनला या गाडीमुळे उशीर होत होता. दादर-रत्नागिरी गाडी दिवा स्थानकामध्ये क्रॉसिंग करते त्यावेळेस साधारणपणे सात ते आठ लोकल गाड्यांना थांबावे लागत होते. त्यामुळे लोकलच्या वक्तशीरपणावर परिणाम होत होता. ही गाडी दिवा स्थानकातून चालविण्यास सुरुवात झाल्यावर लोकल ट्रेनच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे दिव्यावरून रत्नागिरीला जाणाऱ्या ट्रेनचा वक्तशीरपणादेखील सुधारला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मनसेच्या शिष्टमंडळाला देण्यात आली.

त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस वरून गोरखपुरला जाणारी गाडी दादर स्थानकामधून ऑगस्ट २०२२ पासून चालू करण्यात आली. या गाडीला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दादर येथे शिफ्ट करण्यात आले होते. लोकमान्य टिळक टर्मिनसला एलएचबी कोचेसचा मुख्य डेपो बनवल्यानंतर या गाडीला दादर स्थानकामध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. यावेळी या गाडीच्या कोचची संख्यादेखील २२ वरून १७ करावी लागली होती. ही गाडी २०२२ पासून आतापर्यंत दादर स्थानकावरून चालवण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. मध्य रेल्वे कोकणात जाण्यासाठी सध्या एकूण २१ गाड्या प्रतिदिवशी चालवते.

७२ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

या गाड्यांशिवाय आवश्यकतेनुसार विशेष गाड्यादेखील कोंकण रेल्वेसाठी चालविल्या जातात. मागील वर्षी गणेशोत्सवासाठी ३०२ विशेष गाड्या मध्य रेल्वे द्वारे चालविण्यात आल्या होत्या. तसेच मागील वर्षी ५२ उन्हाळी विशेष गाड्या व ३६ होळी विशेष गाड्या देखील चालवण्यात आल्या होत्या. यावर्षी देखील आत्तापर्यंत ७२ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली असून होळीसाठी एकूण १८ विशेष गाड्या चालवण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली

logo
marathi.freepressjournal.in