गणपतीची तिकिटे एका मिनिटांत फुल्ल!घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान

गणपतीची तिकिटे एका मिनिटांत फुल्ल!घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्याचे आव्हान

गेल्या काही वर्षांपासून सामान्य नागरिकांना गणपतीसाठी रेल्वेचे तिकीट मिळणे मुश्कील होऊन बसले आहे

गणपतीच्या मोसमात मध्य रेल्वेकडून कितीही जादा ट्रेन सोडल्या तरी बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत तिकिटे विकली जातात. सामान्य नागरिकांनी कितीही खटाटोप केला तरी त्यांच्या पदरी तिकिटांऐवजी निराशाच येते. हे गौडबंगाल नेमके काय, याबाबतच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यानंतर झोपी गेलेल्या मध्य रेल्वेने धडक मोहीम हाती घेतली. त्यानुसार कोकणात जाणाऱ्या ट्रेनची तिकिटे बुकिंग करणारे १६४ संशयित यूझर आयडी रेल्वे प्रशासनाने शोधले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अपूर्ण प्रोफाईल्स, चुकीचे ईमेल आयडी आणि तिकिटे बुकिंग केल्याचा संशयित इतिहास असलेल्यांची ओळख पटवण्यात आली आहे. या वापरकर्त्यांनी १८१ पीएनआर (प्रवासी नाव नोंद) क्रमांकावरून तिकिटे बुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यापैकी १०२ पीएनआर क्रमांकावरून एका मिनिटांत तिकिटे बुक केली आहेत. या प्रकरणाचा आता कसून तपास सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

गणपती सणासाठी मुंबईतील असंख्य चाकरमानी आपल्या गावाकडे जातात. मात्र रस्त्यावरून प्रवास करताना असंख्य अडचणी येत असल्यामुळे बहुतांश चाकरमानी रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून सामान्य नागरिकांना गणपतीसाठी रेल्वेचे तिकीट मिळणे मुश्कील होऊन बसले आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्यामुळे मध्य रेल्वेने चिंता व्यक्त केली आहे. “नागरिकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात कोणत्या रॅकेटचा समावेश आहे, याचा शोध घेतला जात आहे. बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत या रॅकेटकडून तिकिटे बुक केली जातात. नंतर हीच तिकिटे चढ्या दराने नागरिकांना विकली जातात. याच प्रकरणी आता मध्य रेल्वेने सर्वसमावेशक विश्लेषण करत रॅकेटचा शोध घेण्यास सुरुवात केली.

मध्य रेल्वेने आपल्या यंत्रणा कार्यरत करत अशा घटनांचा छडा लावला आहे. यामध्ये १५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत उघडलेल्या अॅडव्हान्स आरक्षण पीरियड (एआरपी) गणपती उत्सवाच्या हंगामात मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये टाऊटिंग अॅक्टिव्हिटी म्हणजेच दलालांचा हस्तक्षेप असल्याच्या तक्रारी मध्य रेल्वेला प्राप्त झाल्या आहेत. आयआरसीटीसीने अपूर्ण प्रोफाइल, डिस्पोजेबल ईमेल आयडी आणि तिकीट इतिहास यांसारख्या विविध पॅरामीटर्सवर आधारित १६४ वैयक्तिक वापरकर्ता आयडी संशयास्पद स्वरूपाचे असल्याचे ओळखले आहे.

निरीक्षण अहवालात या वापरकर्त्यांनी बुक केलेल्या १८१ पीएनआर तिकिटांची यादी हायलाइट केली असून, त्यापैकी १०२ पीएनआर पहिल्याच मिनिटात बुक करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याबाबत सध्या अधिक चौकशी सुरू असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. यासोबत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यांमधील काऊंटर तिकिटांचे बुकिंग वाटा ८६ टक्के होता, जो गेल्या वर्षीच्या ९३.६९ टक्क्यांपेक्षा थोडा कमी झाला. इतर राज्यांतील बुकिंगमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, लहान स्थानकांमध्ये विशिष्ट काऊंटरवर आरक्षणांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त आहे, ज्याची सध्या पुढील तपासणी सुरू असल्याचेही मध्य रेल्वेने सांगितले.

सीटपेक्षा मागणी जास्त

कोकणात गणपती सणासाठी सोडण्यात येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ५०५८ सीट उपलब्ध असतात. धक्कादायक बाब म्हणजे, आगाऊ आरक्षणामध्ये अवघ्या चार मिनिटांत, १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीसाठी तब्बल ५४,४०१ तिकिटांची बुकिंग करण्यात आली. या कालावधीत ३५,४०६ सीटची क्षमता उपलब्ध असताना, सीटपेक्षा मागणी जास्त असल्याचे उघडकीस आले आहे.

यंदा कोकणात जाणाऱ्याच्या संख्येत वाढ

मे महिन्यात पहिल्या चार मिनिटांसाठी अॅडव्हान्स आरक्षण खुले झाल्यावर एकूण ५४, ४०१ प्रवाशांनी त्यांची तिकिटे बुक केली. त्यापैकी ५,८७५ प्रवाशांनी फिजिकल काऊंटरद्वारे तर ४८,५२६ प्रवाशांनी ऑनलाइन बुकिंग केले. तुलनेने, गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण २५,९९५ प्रवाशांनी त्यांची तिकिटे बुक केली होती. यावर्षी प्रवाशांनी दुप्पट बुकिंग केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in