

मुंबई : जळगाव येथे लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्सप्रेसमध्ये महिलेच्या पर्समधून सुमारे तीन लाखांचे दागिने चोरीला गेले होते. मात्र, मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अवघ्या ३ दिवसांत चोरीचा गुन्हा यशस्वीपणे उघडकीला आणला. दलाने तांत्रिक कौशल्याने तपासणी करत या गुन्ह्याचा छडा लावला.
जळगाव जवळ गाडी क्रमांक १२१६७ लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्सप्रेसमध्ये चोरीची घटना घडली. एका महिला प्रवाशाच्या पर्समधील अंदाजे तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. या प्रकरणाची नोंद जीआरपी भुसावळ/जळगाव येथे करण्यात आली.
सहाय्यक उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायांचा समावेश असलेल्या आरपीएफ च्या विशेष पथकाने हा गुन्हा उघडकीस आणत मुख्य आरोपी महेश लिंगायत याला केवळ ३ दिवसांत अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली तसेच पोरबंदर–शालीमार एक्सप्रेसमध्ये झालेल्या आणखी एका चोरीच्या प्रकरणातील सहभागाची माहिती दिली. यामध्ये प्रवाशाच्या पिशवीतील सुमारे ९ लाख ६४ हजार ४०० रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले होते.