केंद्रीय यंत्रणांचे काम पाळीव प्राण्यांप्रमाणे ; उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका

तुरुंगातून जामिनावर मुक्तता झाल्यानंतर संजय राऊत यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
केंद्रीय यंत्रणांचे काम पाळीव प्राण्यांप्रमाणे ; उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका

केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांप्रमाणे काम करत आहेत. त्यांचा दुरूपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले. अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. बेकायदेशीर अटक देखील केली जाते. केंद्रीय मंत्रीच न्यायव्यवस्थेवर भाष्य करतात, मात्र कर नाही त्याला डर कशाला. जे नुसते घाबरून पक्ष सोडून परत गेले, त्यांच्यासाठी हा धडा आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. तर मूळ शिवसेनेसाठी मला दहा वेळा जरी तुरुंगात जावे लागले, तरी त्याची माझी तयारी असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.

तुरुंगातून जामिनावर मुक्तता झाल्यानंतर संजय राऊत यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. ‘‘न्यायालयानेच केंद्र सरकारला निकालात चपराक दिली आहे, मात्र इतक्या चपराकीनंतरही केंद्राला लाज वाटेल इतकी संवेदनशीलता केंद्राकडे नाही. उलट आता ते संजय राऊत यांना परत एका नव्या खोट्या केसमध्ये गोवण्याचा प्रयत्न करतील. संजय राऊत माझे जवळचे मित्र आहेत. आमच्या कुटुंबाचाच ते एक भाग आहेत. ते आमची लांब पल्ल्याची तोफ आहेत. त्यांना अटक झाली, तेव्हा मी देखील भावूक झालो होतो. त्यांची अटक जसा राऊत कुटुंबियांसाठी खडतर काळ होता, तसा माझ्यासाठी देखील होता. राऊत कुटुंबियांनी जे धैर्य दाखविले, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. आता संपूर्ण देशात बेबंदशाही सुरू आहे. सोरेन, ममतादीदी यांच्यावरही दबावतंत्र सुरू आहे, पण एक लक्षात ठेवावे ही सर्व ताकद एकत्र आली तर केंद्राला ते भारी पडेल,’’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘‘संजय राऊत फडणवीस यांना भेटणार आहेत, त्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले आहे. फडणवीस यांच्याबद्दलची त्यांची भूमिका बदलली आहे का, असा प्रश्न विचारला असता, त्यांना मांडवली करायची असती तर ते शंभर दिवस कैदेत राहिले नसते,’’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in