महामेट्रो व एनएचएआयला आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसचे प्रमाणपत्र प्राप्त

भारतीय राष्ट्रीय महामार्ग (एनएचएआय) चे राजीव अग्रवाल यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले
महामेट्रो व एनएचएआयला आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसचे प्रमाणपत्र प्राप्त

वर्धा मार्गावरील डेबल डेकर पूल व त्यावरील तीन मेट्रो स्टेशन तयार करणारी महामेट्रो व राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाची (एनएचएआय) नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् ने घेतली. या दोन्ही संस्थांकडून महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित व भारतीय राष्ट्रीय महामार्ग (एनएचएआय) चे राजीव अग्रवाल यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

आशियातील सर्वात लांब आणि सर्वात जास्त मेट्रो स्थानके असलेल्या प्रकल्पामध्ये नागपूर मेट्रो रेल प्रकल्पा अंतर्गत वर्धा महामार्गावरील डबलडेकर उड्डाणपूल आणि छत्रपती चौक, जय प्रकाश नगर आणि उज्जवल नगर मेट्रो स्टेशनची नोंद आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. त्याची रीतसर घोषणा करण्यात आली. आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स संस्थेच्या अधिकाऱ्यांतर्फे सदर पुरस्कारा संबंधित प्रमाणपत्र आणि पदक महा मेट्रोला रविवारी प्रदान करण्यात आले. एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनच्या सभागृहात झालेल्या या समारंभात महामेट्रोचे प्रकल्प संचालक श्री महेश कुमार, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी श्रीमती चित्रा जैन, आशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी डॉ. सुनीता धोटे, समन्वयक श्री प्रकाश पोहरे व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना नागपूर मेट्रो देशात सर्वोत्तम असल्याचे नमुद करीत श्री गडकरी म्हणाले, पुण्यातही आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूरसारखीच मेट्रो तयार करण्याचे सांगितले. या डबल डेकर पुलासाठी काम करताना महामेट्रो व एनएचआयचा प्रत्येकी २०, अर्थात ४० टक्के खर्च वाचला. कामठी रोडवरही असाच उड्डाणपूल तयार होत आहे. दोन महिन्यांत या पूलाचेही उद्‍घाटन होईल. आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे नवीन विमानतळाचे कामही लवकरच सुरू होईल. महामेट्रोने आपली बस चालवायला घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. प्रास्ताविक प्रकल्प संचालक महेशकुमार यांनी तर संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in