
मुंबई / नागपूर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहराचे राज्य शासनाच्या वतीने नामांतरण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या परवानगीने नामांतरण झाले आहे. मात्र अद्यापपर्यंत शहरातील रेल्वे स्टेशन व विमानतळावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन व विमानतळावर छत्रपती संभाजीनगर असा नामोल्लेख करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात मंगळवारी केली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व कृषी उत्पन्न बाजार समिती या स्थानिक संस्थावर सुद्धा छत्रपती संभाजीनगर असा नामोल्लेख होत नसल्याचे दानवे यांनी निदर्शनास आणून दिले. धाराशिव व अहिल्या नगरचे सुद्धा नुकतेच नामांतरण झाले आहे. येथील स्थानिक संस्थांवरही नव्या नावाचा नामोल्लेख करण्यात यावा, अशीही मागणी दानवे यांनी केली.