
मुंबई : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आरपारच्या लढाईत आहेत. कोणत्याही क्षणी मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्यानेच भुजबळ यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्यानंतर भुजबळ यांनी ओबीसींसाठी आपला लढा कायम असेल, असे ठामपणे सांगितले.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळाली. असे असतानाही सर्वात जास्त अनुभवी असलेल्या भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. त्यामुळे भुजबळ यांनी अजित पवारांविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला न थांबता भुजबळ माघारी परतले होते. त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सागर बंगल्यावर भुजबळ आणि फडणवीस यांच्यात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे अद्याप समोर आले नाही. पण दोन्ही नेत्यांत भुजबळांना मंत्रिपद नाकारणे व त्यानंतरच्या त्यांच्या राजकीय वाटचालीवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या चर्चेदरम्यान भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हेसुद्धा उपस्थित होते. मात्र नंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, फडणवीस यांच्याशी सामाजिक व राजकीय आदी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. वर्तमानपत्रातून आणि टीव्हीच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी मी पाहिल्या आणि ऐकल्या. ओबीसींच्या पाठबळामुळेच महायुतीचा महाविजय झाल्याचे फडणवीस यांनी मान्य केले. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. यासाठी त्यांनी पुढील मार्ग काढण्यासाठी ८ ते १० दिवसांचा वेळ मागितला आहे. आम्ही पुन्हा भेटून ओबीसींच्या मुद्द्यावर साधकबाधक चर्चा करणार असल्याचा निरोप ओबीसी नेत्यांना सांगा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
तुमची अजित पवारांकडून फसवणूक झाली का? असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, मला माहिती नाही, तुम्हाला काय निष्कर्ष काढायचा तो काढा. ओबीसींसाठी आम्ही आवाज उचलला. नव्या लोकांना द्यायचे असेल तर मला उभे करायचे नव्हते. आमच्यापेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अधिक निवडून आले. परभणी व बीडमध्ये शरद पवार हे अजित पवारांच्या आधी पोहोचले.
भुजबळांसारखा नेता आमच्यासोबत मैदानात हवा - फडणवीस
माझी भेट झाल्यानंतर भुजबळ साहेबांनी तुम्हाला सर्व सांगितले आहे. त्यामुळे आमची काय चर्चा झाली, हे पुन्हा एकदा सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही. भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्षांचा सन्मान आम्ही राखू. आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदादा देखील त्यांची चिंता करतात. आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीने मार्ग काढला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.