
मुंबई : रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कथित घोळाचे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांची न्या. शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत आमदार महेश बालदी यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोगाला समन्स बजावले.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश बालदी हे भाजपचा तिकिटावर निवडून आले. २०१९ मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. त्यावेळी भाजपने त्यांना पाठींबा दिला होता. २०२४ च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी संपत्तीचा तपशील जाहीर केला नाही, असा दावा करीत उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार सुधाकर पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.
पाटील यांनी संपत्ती जाहीर न केल्याच्या मुद्द्यावर २०१९ मध्ये निवडणूक याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे. याच दरम्यान प्रीतम म्हात्रे यांच्या वतीने ॲड. प्रियांका ठाकूर यांनी आमदार बालदींच्या निवडीला आव्हान दिले आहे भ्रष्ट पद्धतीच्या अवलंब केल्याने त्यांचा विजय रद्द घोषित करण्याची मागणी याचिकेतून केली आहे.
या दोन्ही याचिकांवर न्या. शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने समोर प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी १० मार्चला निश्चित करताना आ. बालदी यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोगाला समन्स जारी केले.