राज्यात तीन दिवसांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असूनही प्रत्यक्षात मोसमी पाऊस गोव्यातच अडकून पडला आहे. गुरुवारी तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता असून, शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात तीन दिवसांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता
Published on

पुणे : मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असूनही प्रत्यक्षात मोसमी पाऊस गोव्यातच अडकून पडला आहे. गुरुवारी तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता असून, शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

केरळहून पुढे आगेकूच करीत असलेला मोसमी पाऊस मंगळवारी गोव्यात दाखल झाला होता. मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. त्यामुळे बुधवारी तळकोकणात पाऊस दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात पाऊस गोव्यातच अडकून पडला. सिंधुदुर्गमध्ये बुधवारी ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही ठिकाणी हलका पाऊसही झाला. पण, तो पूर्वमोसमी पाऊस होता. मात्र, आता गुरुवारी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने येत्या शनिवारी व रविवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्याच्या अन्य भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. रविवारपासून पुढील दोन दिवस मुंबईसह कोकण व पश्चिम घाटात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भासह राज्याच्या बहुतेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

मोसमी पाऊस विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यभरात सोमवारपर्यंत दाखल होईल. तसेच पुढील तीन दिवस मुंबईसह किनारपट्टी आणि पश्चिम घाटात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

logo
marathi.freepressjournal.in