चंद्रपुरात ठाकरे सेनेची भाजपशी युती; काँग्रेसचा एका मताने पराभव

चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार केले आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व भाजप एकत्र आले. ठाकरेंच्या शिवसेनेने महापौरपदासाठी भाजपला साथ दिल्याने कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला.
चंद्रपुरात ठाकरे सेनेची भाजपशी युती; काँग्रेसचा एका मताने पराभव
चंद्रपुरात ठाकरे सेनेची भाजपशी युती; काँग्रेसचा एका मताने पराभव
Published on

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार केले आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व भाजप एकत्र आले. ठाकरेंच्या शिवसेनेने महापौरपदासाठी भाजपला साथ दिल्याने कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला. या नव्या समीकरणामुळे चंद्रपूरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना ठाकरे गट व भाजपमधील करारानुसार भाजपला महापौरपद मिळणार, तर ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समितीवर नियंत्रण मिळणार असल्याचे ठरले आहे.

या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदी विराजमान झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अतिशय चुरशीच्या लढतीत पराभव केला. खांडेकर यांना ३२ मते मिळाली, तर महाडोळे यांना ३१ मते मिळाली. अवघ्या एका मताच्या फरकाने झालेला हा निकाल महापालिकेतील राजकीय संतुलन बदलवणारा ठरला.

ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले. काँग्रेसनेही स्थायी समिती देऊ केली होती; मात्र पुढील पाच वर्षांत महापौरपद मिळण्याची शक्यता नसल्याने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत थेट सहभाग आणि प्रभावी भूमिका मिळावी, या विचारातून हा निर्णय झाल्याचे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा फटका - सपकाळ

चंद्रपूरमध्ये ठाकरे सेनेचा भाजपला पाठिंबा ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ठाकरे सेनेसोबत वंचितचे दोन नगरसेवकही भाजपसोबत जाणार असल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली. अंतर्गत गटबाजीचा फटका काँग्रेसला बसत असल्याचे सपकाळ यांनी मान्य केले.

logo
marathi.freepressjournal.in