चंद्रपूरः जिल्ह्यातील राजूरा तालुक्यात गुरुवारी ट्रक आणि ऑटोरिक्षाचा भीषण अपघात झाला. यात तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हा अपघात दुपारी सुमारे चारच्या सुमारास राजुरा-गडचंदूर रोडवरील कपनगावजवळ झाला. सात प्रवासी घेऊन जाणारी ऑटोरिक्षा राजूराहून पाचगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने तीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला, असे राजुरा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्वांना रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर उर्वरित जखमींपैकी तिघांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असेही त्यांनी सांगितले.
मृतांमध्ये वर्षा मंडळे (४१), तनु पिंपळकर (१८), ताराबाई पापुलवार (६०), रवींद्र बोबडे (४८), शंकर पिपरे (५०) आणि ऑटोरिक्षा चालक प्रकाश मेश्राम (५०) यांचा समावेश आहे.
दरम्यान, पोलिसांनी ट्रक जप्त केला असून त्याचा चालक फरार आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.