चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी

बावनकुळेंना यापूर्वी विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली आणि आता प्रदेशाध्यक्षपदही मिळाले
Twitter/@cbawankule
Twitter/@cbawankule
Published on

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपने आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली असून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील यांचे मंत्रिमंडळात नाव आल्यानंतर भाजपने ही नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे.

आशिष शेलार हे यापूर्वी मुंबईचे प्रदेशाध्यक्षही होते. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्षपद एकाच व्यक्तीला देण्याच्या बाजूने भाजपचे वरिष्ठ नेतृत्व तयार नव्हते. प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार आणि राम शिंदे यांची नावे चर्चेत होती. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी एका ओबीसी चेहरा आणि विदर्भवादी चेहऱ्याला संधी दिल्याची चर्चा आहे. याच बावनकुळेंना यापूर्वी विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली आणि आता प्रदेशाध्यक्षपदही मिळाले.

गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे आगामी निवडणुकीचा विचार करून त्यांच्यावर पुन्हा एकदा ही जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भातील असून त्यांच्यानंतर भाजपनेही विदर्भातील एका चेहऱ्याला संधी दिली आहे. विदर्भात काँग्रेस आणि भाजपचे मोठे अस्तित्व असून तुलनेने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संघटन तेवढे मजबूत नाही. त्यामुळे विदर्भात भाजप की काँग्रेस बाजी मारते हे येत्या काळात समजेल.

logo
marathi.freepressjournal.in