उद्धव ठाकरेंच्या टीकेला  चंद्रशेखर बावनकुळेंचे  प्रत्युत्तर; 'महाराष्ट्राचा महानालायक...'

उद्धव ठाकरेंच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; 'महाराष्ट्राचा महानालायक...'

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देशाई यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडण्याची स्पर्धा सुरू आहे. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हा नालायक आणि कोडगा माणूस आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देशाई यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत केली आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. 'महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील', असे प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले आहे.

चंद्रशेखर बवानकुळेंनी ट्वीटमध्ये म्हणाले, "महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता. पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले, १०० कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला, कोविडमध्ये लोक मरत असताना घोटाळे केले, मृतदेहाच्या बॅगमध्ये मलिदा लाटला. याला कोडगेपणा म्हणतात. देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बसायचं, मुलाला मंत्रिपद द्यायचं आणि बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडायचं याला कोडगेपणा म्हणतात', असे चोख प्रत्युत्तर बावनकुळेंनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना दिले आहे.

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?

दक्षिण मध्य मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रसारासाठी वडाळा अँटॉप हिल येथे घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, "मी अडीच वर्षात आदित्यला ग्रुम करतो. मग अडीच वर्षानंतर आदित्यला मुख्यमंत्री करतो. त्यावेळी मी म्हटले की, उगाच आदित्यच्या डोक्यात काही घालू नका. यानंतर मी माझा पुढचा प्रश्न असा होता की, आदित्यला मुख्यमंत्री करा असे तुम्ही म्हणत आहात. तुम्ही ऐवढे जेष्ठ नेते मुलाच्या हाताखाली कसे काम करणार? हा प्रश्न फडणवीसांना केला. तुम्ही मला सांगा माझा हा प्रश्न बरोबर होता की चूक, असा सवाल उद्धव ठाकरेंनी सभेतील उपस्थितांना विचारला आहे. त्यावेळी उपस्थितांनी उद्धव ठाकरेंचा प्रश्न बरोबर असल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, अडीच वर्षानंतर मी दिल्लीत जाणार, मला अर्थ खात्यातील कळते. म्हणजे फडणवीसांना अर्थमंत्री होण्याची इच्छा होती, मी फडणवीसांचे बिंग फोडल्यानंतर ते तडफडले आहेत. यानंतर ते मला भ्रमिष्ट म्हणाले ठिक आहे. मी भ्रमिष्ट आहे की नाही हे लोक ठरवतील. पण, देवेंद्रजी तुमची आज जी अवस्था झाली आहे. ती फार वाईट आहे. आधी फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे अमित शहांना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेलेत आणि नंतर म्हणाले देवेंद्रनी शब्द दिला. आहो, देवेंद्र जनाची नाही तर, मनाची ठेवा. दोन्ही तुम्हाला नाही हे आम्हाला माहिती आहे. लाजलज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे. ज्याला तुम्ही कोणती तरी खोली म्हणताय. तुमच्यासाठी कुठली तरी खोल्या बऱ्याच असतील. ती खोली मातोश्रीमधील मंदिर आहे. ती खोली बाळासाहेबांची आहे आणि त्याच खोलीत अमित शहा नाक घासायला आले होते.", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in