
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. यावेळी देशाचा भावी पंतप्रधान कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न बावनकुळे करताना दिसत आहेत. भाजपच्या महाविजय २०२४ संकल्प यात्रेदरम्यान चंद्रशेखर बावनकुळे हे वर्धा जिल्ह्यात होते. यावेळी स्थानिकांशी संवाद साधताना बावनकुळे यांच्यावर चांगलीच नामुष्की ओढावली. बावनकुळे यांनी एका महिलेला २०२४ साली देशाचा पंतप्रधान कोण व्हावा असं वाटत असा प्रश्न विचारला. यावेळी महिलेल्या उत्तराने बावकुळे यांची चांगलीच फजिती झाली.
गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेच जाऊन मांडण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे. याच निमित्ताने चंद्रशेखर बानवकुळे हे जनतेच्या मनातलं जाणून घेण्यासाठी थेट जनमान्यात मिसळून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहेत. काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीत जाऊन लोकांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी एका तरुणाना २०२४ साली पंतप्रधान कोण हवा याबाबतचा प्रश्न विचारला असता त्यावर त्या तरुणाने राहुल गांधी हे उत्तर दिलं होतं. यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांची चांगलीच फजिती झाली होती. त्यानंतर आता वर्धा जिल्ह्यात चंद्रशेखर बावनकुळे यांची अशीच फजिती झाली आहे.
वर्ध्यातील साई मंदिर ते अंबिका चौकापर्यंच्या यात्रेदरम्यान महिलांना २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावर एका महिलेने महागाईवरुन संताप व्यक्त केला. महिलेची भावना लक्षात येताच बावनकुळे यांनी महिलेसमोर धरलेला माईक खाली केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या महिलेने वाढत्या महागाईवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सरकार विजेचं बिल वाढवून देतं. सिलेंडर वाढवून देतं. आम्हाला काम धंदे नाहीत. माती खायची का? असा तिखट सवाल यावेळी महिलेने केला. त्यावर आपण स्टेजवर बोलू, तुम्ही स्टेजवर चला असं म्हणत बावनकुळे यांनी प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला.