सीसीटीव्ही तपासा, आयोगाकडून चौकशी होऊ द्या - विनोद तावडे

Maharashtra assembly elections 2024: माझ्यावरील आरोप चुकीचे असून या प्रकरणी आयोगाकडून चौकशी होऊ द्या, तसेच सीसी टीव्ही तपासा, असे आव्हान विनोद तावडे यांनी दिले आहे.
सीसीटीव्ही तपासा, आयोगाकडून चौकशी होऊ द्या - विनोद तावडे
Published on

माझ्यावरील आरोप चुकीचे असून या प्रकरणी आयोगाकडून चौकशी होऊ द्या, तसेच सीसी टीव्ही तपासा, असे आव्हान विनोद तावडे यांनी दिले आहे. ते म्हणाले की, वाडा येथून मंगळवारी मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजप उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यावयाची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. मा. हितेंद्र ठाकूर व आ. क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजप कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यासंदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे ‘दूध का दूध, पानी का पानी’ स्पष्ट होईल. यासंदर्भात टीका करणाऱ्या राहुल गांधी व सुप्रिया सुळे या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून निःष्पक्ष चौकशी व्हावी, असे तावडे यांनी सांगितले.

पैसे वाटपाचे सर्व आरोप खोटे

पैसे वाटपाबाबत माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया पैसे वाटपाच्या कथित आरोपामुळे अडचणीत आलेले भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. ज्या पैशांवरून राडा केला ते माझे नाहीतच. ज्या खोल्यांत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो, असे तावडे यांनी म्हटले आहे. याचबरोबर जेवढा त्यांनी दावा केला आहे, तेवढे पैसे सापडले नाहीत तर मी ते ठाकुरांकडून वसूल करणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in